Kolhapur: जोतिबा यात्रेकरूंसाठी सहजसेवाचे उद्यापासून अन्नछत्र, ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:05 IST2025-04-09T17:05:38+5:302025-04-09T17:05:52+5:30

सेवाकार्याचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष

Sahaj Seva Annachhatra for Jyotiba pilgrims from tomorrow, 400 volunteers will work round the clock | Kolhapur: जोतिबा यात्रेकरूंसाठी सहजसेवाचे उद्यापासून अन्नछत्र, ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार

Kolhapur: जोतिबा यात्रेकरूंसाठी सहजसेवाचे उद्यापासून अन्नछत्र, ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार

कोल्हापूर : चैत्र यात्रेला जोतिबा देवाच्या दर्शनाची आस घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी अहोरात्र अन्नदानाचे मोठे पुण्यकर्म करणाऱ्या सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र यंदादेखील भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. उपक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, १० ते १३ तारखेदरम्यान गायमुख येथे अन्नछत्र उभारले जात असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा, मनीष पटेल, रोहित गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्री जोतिबाची चैत्र यात्रा यंदा शनिवारी (दि. १२) होत आहे. यात्रेकरूंसाठी डोंगरावरील गायमुख परिसरात अन्नछत्रासाठी १५ हजार चौरस फुटांचा मोठा मांडव तसेच चहा व मठ्ठ्यासाठी वेगळा मंडप घातला आहे. येथे भक्तांना २४ तास चहा, तर दुपारी मठ्ठा दिला जाईल. बैलगाडी घेऊन येणाऱ्या भाविकांच्या बैलांसाठी शेंगदाणा पेंड व भुस्सा दिला जाणार आहे. जेवण करण्यासाठी २० मुख्य आचारी, मदतनीस, भाजी चिरण्यासाठी ३० महिला, ५० वाढपी भांडी धुण्यासाठी ७० महिला, ताटे स्वच्छ पुसून देण्यासाठी व इतर कामांसाठी ५० श्रमिक; तसेच जेवण वाढण्यासाठी विश्वस्त, स्नेही, हितचिंतक असे ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत. 

येथेच सीपीआर रुग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबिर तसेच नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. ज्या दानशूर व्यक्ती, संस्थांना या उपक्रमासाठी मदत करायची आहे, त्यांनी सहजसेवा ट्रस्ट, ३९८, आशिष चेंबर्स, बसंत-बहार सिनेमासमोर, स्टेट बँक कोषागार शाखा बिल्डिंग, शाहूपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे लागते साहित्य

बासमती तांदूळ : १५ हजार किलो, तूरडाळ : ३ हजार किलो, रवा : ६ हजार किलो, साखर : १० हजार किलो, तेलाचे डबे : ५००, दूध : ७ हजार लिटर, बटाटा : ३ हजार किलो, कांदा : ४ हजार किलो, चहा पावडर : ३०० किलो, मूग, काळा घेवडा : प्रत्येकी ३०० किलो, लसूण : २०० किलो, लाकूड : ४ टन, गॅस सिलिंडर : २००; याशिवाय ट्रक भरून भाजीपाला, गोडा मसाला, चटणी व इतर मसाल्याचे पदार्थ.

वाहनांची मोफत सेवा

कोल्हापूर वेध ट्रेनिंग टू व्हीलर मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून दोन दिवस ना दुरुस्त व पंक्चर झालेल्या दुचाकी वाहनांची मोफत सेवा देण्यात येणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून असोसिएशनच्या माध्यमातून हे काम अखंडितपणे केले जाते. येत्या शुकवारी राधेय ऑटो, शनिवार पेठ येथे या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ही सेवा शुक्रवार व शनिवार अशी दोन दिवस जोतिबा डोंगर येथे देण्यात येणार आहे. प्रा. वैभव पाटणकर, प्रवीण देवेकर, प्रशांत साळोखे, विनोद म्हाळुंगे, रवी चिले, संदीप पाटील, प्रशांत जाधव, संदीप कदम, अभी हणबर, शिवाजी लोहार यांच्यासह १००हून अधिक मेकॅनिक्स या उपक्रमात सहभागी असतील.

Web Title: Sahaj Seva Annachhatra for Jyotiba pilgrims from tomorrow, 400 volunteers will work round the clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.