‘भूविकास’च्या इमारतीत होणार ‘सहकार भवन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:13+5:302021-08-19T04:28:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भूविकास बँकेच्या येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील इमारतीत सहकार भवन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भूविकास बँकेच्या येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील इमारतीत सहकार भवन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सहकार विभागाची सर्व कार्यालये यामुळे एकाच छताखाली येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील बँकेच्या ९४२ थकबाकीदार शेतकऱ्यांची ३४ कोटी ७३ लाखांची कर्जमाफी होणार असून, बँकेच्या २०८ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची १२ कोटी २५ लाख रुपये देय रक्कमही देण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
भूविकास बँकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील ९४२ शेतकऱ्यांकडे ३४ कोटी ७३ लाख रुपये थकीत कर्ज होते. ‘ओटीएस’नुसार ५ कोटी ६१ लाख रुपये देय राहतात. ही रक्कम माफ करुन या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांची १२ कोटी २५ कोटी रक्कम देत असताना बँकेच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बॅंकेची चार मजली इमारत आहे, त्याचबरोबर हातकणंगले येथेही इमारत आहे. या दोन्ही ठिकाणी १६ कोटी ५४ लाखांच्या मालमत्ता आहेत. मुख्य इमारतीच्या ठिकाणी सहकार विभागातील विविध कार्यालये एकत्रित केली जाणार आहेत.
फटाके वाजवून कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव
‘भूविकास’च्या कर्मचाऱ्यांची दहा वर्षांपासून रक्कम देय आहे. ग्रॅच्युईटी, रजा पगार, नुकसानभरपाई, महागाई निर्देशांक व थकीत पगार अशा रकमा अडकल्या होत्या. कर्मचारी संघटनांनी निकराची झुंज दिल्यानंतर न्याय मिळाल्याने बँकेच्या दारात फटाके वाजवून कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
‘एस. आर.’ यांच्यामुळे झाले जिल्हा बँकेत रूपांतर
भूविकास बँक ही राज्य पातळीवर एकच होती, त्याच्या शाखा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत्या. मात्र स्वर्गीय एस. आर. पाटील (पाडळी खुर्द) यांच्या प्रयत्नामुळे २००१ला जिल्हा बँकेत रुपांतर झाले.
कोट-
भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा २० वर्षांचा थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे हाल व्हायचे, काहींनी आत्महत्याही केली आहे. अखेर शासनाने न्याय दिला, यासाठी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची साथ मिळाली.
- एम. पी. पाटील (कार्याध्यक्ष, कर्मचारी संघटना)
बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी अनेकवेळा सभागृहात केली होती. मात्र उशिरा का असेना राज्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, याचे समाधान आहे.
- आमदार प्रकाश आबिटकर
दृष्टीक्षेपात भूविकास बँक -
कर्जमाफी मिळणारे शेतकरी - ९४२
थकीत रक्कम - ३४ कोटी ७३ लाख
ओटीएस रक्कम - ५ कोटी ६१ लाख
सेवानिवृत्त कर्मचारी - २०८
देय रक्कम - १२ कोटी २५ लाख
मालमत्ता मूल्यांकन -
मुख्य इमारत, कोल्हापूर - १२ कोटी ४१ लाख
हातकणंगले - ४ कोटी १३ लाख
फोटो ओळी : भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देय रकमेचा निर्णय झाल्यानंतर बँकेच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. (फोटो-१८०८२०२१-कोल-भूविकास बँक ०१)