साहेब घाबरला की खंडणीचा दर लगेच वाढलाच..!! 

By विश्वास पाटील | Published: January 14, 2024 07:28 AM2024-01-14T07:28:53+5:302024-01-14T07:29:16+5:30

सरकारी कार्यालयातील दहशत : आंदोलनाची भिती दाखवून होते पैशाची मागणी

Saheb got scared and the rate of extortion increased immediately..!! | साहेब घाबरला की खंडणीचा दर लगेच वाढलाच..!! 

साहेब घाबरला की खंडणीचा दर लगेच वाढलाच..!! 

कोल्हापूर : विविध संघटनांच्या नावांखाली सामाजिक कार्याचा बुरखा पांघरलेल्या कार्यकर्त्यांकडून सरकारी कार्यालयात खंडणीचा त्रास वाढला आहे. आंदोलनाची भिती दाखवून हा प्रकार सुरु आहे. मनस्ताप नको म्हणून अधिकारी चार पैसे देतात... त्यात साहेब आपल्याला घाबरला आहे अशी भावना झाली की लगेच दर वाढत असल्याचा अनुभव कांही अधिकाऱ्यांनी लोकमतकडे व्यक्त केला. कोल्हापुरात फाळकूट दादांवर पोलिस कारवाई करू लागले आहेत परंतू यांच्यावर कोण कारवाई करणार अशी विचारणा सरकारी अधिकाऱ्यांतून होत आहे.

या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा रुबाब कसा असतो त्याचे वर्णनच या अधिकाऱ्यांने सांगितले. मुख्यत: महसूल, शिक्षण, भूमिअभिलेख, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद कार्यालयात हे कार्यकर्ते जातात. एकजण धावत धावत अगोदर कार्यालयात घुसतो..आमचे साहेब आले..साहेब आले..असे सांगत वातावरण निर्मिती करतो. गळ्यात संघटनेच्या रंगाचे उपरणे, पांढरी कपडे, गॉगल असा पोषाख असतो. मग कांही वेळातच चार-पाच कार्यकर्त्यासह त्या संघटनेचे स्वयंघोषित अध्यक्ष येवून अधिकाऱ्यांसमोरील मधल्या खुर्चीत बसतो. अगोदर पुढे आलेला कार्यकर्ता आमच्या साहेबांना ओळखले का म्हणून विचारणा करतो आणि स्वत:च त्यांची ओळख सांगतो. 

साहेबांचे खूप मोठ्ठ काम आहे..आम्ही गोरगरिबांना न्याय मिळवून देतो. आमची संघटना इतकी वर्षे काम करते असे सांगत कांही आंदोलनाचे व्हिडीओही दाखवतो. हे झाल्यावर मग हळूच मागणी पुढे येते. अधिकारी व्यवहारांने चांगला असेल तर तो फारशी दाद देत नाही. पाकिट काढून शे-पाचशे काढून देतो परंतू ते घेत नाहीत.संबंधित अधिकाऱ्याबद्दल तक्रारी असल्यास पैशाची मागणी जास्त होते. पाचशे-हजार घेऊन मगच कार्यकर्ते उठतात.पैसे नाहीच दिले तर मग माहिती अधिकाराचा अर्ज देणे, कार्यालयातील त्रुटी शोधून आंदोलनाची धमकी देणे असे प्रकार केले जात असल्याचे अनुभव आहेत.

तेलाचे डबे, टेम्पोचे भाडे.. 
आम्ही गरिब महिलांना दत्तक घेतले आहे, त्यांच्यासाठी दहा साड्या द्या. अमुक परिसरात महाप्रसाद आहे त्यासाठी पाच तेलाचे डबे किंवा ५० किलो तांदूळ द्या..असे सांगत टेबलवर पावती पुस्तक ठेवले जाते. पावती पुस्तकांवर नंबर वगैरे कांहीच नसते. आंदोलनासाठी मुंबईला कार्यकर्त्यांना घेवून जायचे आहे, दोन टेम्पोचे भाडे द्या, अशीही मागणी अनेकदा होते.

Web Title: Saheb got scared and the rate of extortion increased immediately..!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.