साहेबाच्या 'एक्झिट'ने बटकणंगलेकरांना धक्का..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:51+5:302021-07-14T04:29:51+5:30
बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमात नेहमी हिरीरीने पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर ...
बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमात नेहमी हिरीरीने पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयातील उपअभियंता एकनाथ गुंडू तथा ई. जी. पाटील (साहेब) यांच्या अकाली निधनाने बटकणंगले ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर-राधानगरी मार्गावर आणाजे गावानजीकच्या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
बटकणंगले येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी मोठ्या जिद्दीने स्थापत्यशास्त्राची अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेवेत रूजू झाले.
सुरुवातीला काही काळ त्यांनी कोकणात काम केले. दरम्यान, त्यांची कोल्हापूरला बदली झाली. सध्या कागल पंचतारांकित एमआयडीसीचा कारभार त्यांच्याकडे होता. स्वच्छ चारित्र्याचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते परिचित होते. अधिकारपदाचा बडे जाव त्यांनी कधीच मिरविला नाही.
स्वत:चा उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपडणाºया तरुणांना एम.आय.डी.सी.त जागा मिळवून देण्याबरोबरच सर्वप्रकारची मदत व मार्गदर्शन करून अनेकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी निरपेक्षपणे मदत केली.
त्यांना सेंद्रीय व शाश्वत शेतीची प्रचंड ओढ होती. त्यासाठी व्हॉटस अॅपवर 'आपली माती...आपली माणसं' या नावाने ग्रुप तयार करून ते गडहिंग्लज विभागातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत असत. सेवानिवृत्तीनंतर सेंद्रीय शेतीत झोकून देण्याची त्यांची इच्छा होती.
बटकणंगलेचे ग्रामदैवत श्री भैरी मंदिराची उभारणी, जलफौंडेशनच्या माध्यमातून पाणी आणि वृक्षलागवडीची चळवळ सुरू केली. त्यांच्या धडपडीमुळेच अलीकडे गावासाठी ४४ लाखांच्या पाझर तलावाला मंजुरी मिळाली आहे.
गावच्या विकासासाठी हयातभर झटलेले ध्येयवादी शिक्षक बी. वाय. जाधव यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याच्या आयोजनातही त्यांचाच पुढाकार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांचे ते जावई होत.
-----------------------------
* दोन महिन्यांपूर्वीच बढती..!
दोन महिन्यांपूर्वीच पाटील यांना उपअभियंतापदी बढती मिळाली होती. मात्र, पदोन्नतीची नेमणूक मिळण्यापूर्वीच शून्यातून उभारलेल्या सज्जन व लोकाभिमुख अधिकाऱ्यावर काळाने झडप घातली. त्यामुळे बटकणंगले पंचक्रोशीसह 'एमआयडीसी'मधील उद्योजक व कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
-------------------------
- एकनाथ पाटील : १३०७२०२१-गड-०४