मुंबईतील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे सह्याद्री एक्स्प्रेसला ब्रेक, विस्तारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:55 AM2024-12-11T11:55:23+5:302024-12-11T11:55:44+5:30
कोल्हापूर : मुंबई - कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याच्या सूचना पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत ...
कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याच्या सूचना पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत जरी करण्यात येत असला आणि प्रवाशांची आग्रही मागणी असली तरी मुंबईत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ सह इतर दोन प्लॅटफॉर्मचे काम सुरू असल्याने ही गाडी मुंबईपर्यंत धावण्याला त्याचा मोठा अडसर आहे. मार्च महिन्यापर्यंत या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्याचे आव्हान मध्य रेल्वेकडे आहे.
मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुण्यापर्यंत सोडण्यात येते. त्याची मुदत ३१ डिसेंबर अखेर आहे. त्यानंतर ही गाडी मुंबईपर्यंत सोडावी, अशी आग्रही मागणी प्रवासी करत आहेत. मुंबईपर्यंत धावणारी ही गाडी कोरोना काळापासूनच बंद केली होती. त्यानंतर ही गाडी विशेष रेल्वे म्हणून पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यानुसार दोन वेळा या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. परंतु ही गाडी मुंबईपर्यंत सोडावी, अशी मागणी जोर धरू लागली.
विशेषत: मुंबईशी ज्यांचा जवळचा संपर्क आणि संबंध आहे अशा चंदगड आणि गडहिंग्लज भागातील प्रवाशांना याची गरज वाटत आहे. त्यामुळे पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूरचे प्रतिनिधी शिवनाथ बियाणी यांच्यासह अनेकांनी ही गाडी मुंबईपर्यंत सोडण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. परंतु मुंबईत फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.
मार्च महिन्यानंतर मिळणार गती
ही गाडी मार्चपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर मार्गी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय मिरज ते पुणे मार्गावरील रहिमतपूर, तारगाव आणि कोरेगाव या ठिकाणच्या दुहेरीकरणाचे कामही सुरू आहे. त्या कामालाही मार्च महिना उलटणार आहे, त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतरच या गाडीला गती मिळेल अशी स्थिती सध्या आहे.