साईबाबांच्या पादुका येणार कोल्हापुरात, मंगळवारपासून दोन दिवस दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:35 PM2018-09-21T16:35:41+5:302018-09-21T16:38:59+5:30
श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या पादुका कोल्हापुरात येणार आहेत. मंगळवारी व बुधवारी (दि. २५ व २६) भाविकांना (दि. २५ व २६) या पादुकांचे दर्शन घेता येईल.
कोल्हापूर : श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या पादुका कोल्हापुरात येणार आहेत. मंगळवारी व बुधवारी (दि. २५ व २६) भाविकांना (दि. २५ व २६) या पादुकांचे दर्शन घेता येईल, अशी माहिती दिलबहार तालीम मंडळाचे अध्यक्ष विनायक फाळके व परमपूज्य आनंदनाथ महाराज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या सहयोगातून श्री साई सेवा मंडळ व दिलबहार तालीम मंडळाच्या वतीने या धार्मिक उपक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे.
शिर्डीस्थित श्री साईबाबांच्या पादुकांचे मंगळवारी रविवार पेठेतील साईमंदिरात सकाळी सहा वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर मिरवणुकीने या पादुका शिवाजी स्टेडियमजवळील श्री साई दरबार येथे ठेवण्यात येतील. याावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील.
मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांना या पादुकादर्शनाचा लाभ घेता येईल. त्यानंतर या पादुका पुन्हा शिर्डीसाठी रवाना होतील. दरम्यान, मंगळवारी रात्री आठ वाजता श्री साई भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तरी नागरिकांनी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-