तिळावर लिहिली साई लीलामृत
By admin | Published: March 3, 2015 12:19 AM2015-03-03T00:19:47+5:302015-03-03T00:26:25+5:30
गजेंद्र वाढोवणकरांची कला : वारणानगरमध्ये कौतुक
वारणानगर : तांदूळ, तीळ व मोहरी यावर गजेंद्र वाढोवणकर यांनी लिहिलेल्या साई लीलामृत ग्रंथाचे येथील शास्त्री भवनमध्ये अनेकांनी दर्शन घेऊन त्यांच्या अद्भूत शैलीचे कौतुक केले.औरंगाबाद येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते गजेंद्र वाढोवणकर यांनी आपल्या कलेतून साई लीलामृत ग्रंथ तांदूळ, तीळ व मोहरी यावर लिहिला आहे. हा ग्रंथ दान स्वरूपात मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात शिर्डी येथील साई संस्थानकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तो ग्रंथ तेथील म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सोमवारी सकाळी गजेंद्र वाढोवणकर व सहकाऱ्यांचे वारणानगर येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. ही दिंडी शास्त्री भवन येथे आली. त्याठिकाणी वारणासमूहाचे नेते विनय कोरे यांच्या हस्ते पूजन व आरती होऊन ग्रंथ सर्वांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. पहिल्या पानावरील श्री सार्इंची हसऱ्या चेहऱ्याची प्रतिमा व ग्रंथातील मजकूर सर्वांना भिंगाद्वारे दाखविण्यात आला. यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे, संचालक सुभाष पाटील, कार्यकारी संचालक व्ही. एस. चव्हाण, प्र. कार्यकारी संचालक व्ही. एस. कोले, बी. जी. सुतार, एस. ए. कुलकर्णी, आर. डी. पाटील, जयसिंग पाटील, के. डी. पाटील, स्नेहा कोरे, शुभलक्ष्मी कोरे, मंगला पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी गजेंद्र वाढोवणकर, त्यांची पत्नी वीणा, वडील सूर्यकांत, आई कमलताई तसेच गोकुळ पाटील, गणेश उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
भारतातील अनेक शहरांसह सहा देशात या ग्रंथाचे अनेकांनी दर्शन घेतले आहे. आपण एका वेगळ्याच स्फूर्तीतून हा ग्रंथ आॅस्ट्रेलियामध्ये लिहिला आहे. त्यासाठी पाच लाख चार हजार ५४४ तांदूळ व तीळ लागले आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे छायाचित्र, व्हाईट हाऊस व झेंड्याची प्रतिकृती तांदळावर काढून त्यांना भेट दिली आहे.
- गजेंद्र वाढोवणकर.