‘यंग ब्रिगेड’ घेऊन खेळणार साईनाथ स्पोर्टस
By admin | Published: November 21, 2014 11:58 PM2014-11-21T23:58:57+5:302014-11-22T00:14:23+5:30
असा खेळअशी रणनीती
सचिन भोसले - कोल्हापूर --‘फुटबॉल पंढरी’ समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये चांगल्या संघाला क्रीडारसिकांनी नेहमीच दाद दिली आहे. असाच खेळ करणारा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिले जाते त्या ‘साईनाथ स्पोर्टस्’ने यंदा ‘यंग ब्रिगेड’वर भर दिला आहे. संघाच्या व्यवस्थापनाने हार-जीतपेक्षा क्रीडारसिकांची एक थापही या संघाला उभारी देणारी असल्याची भावना मानून यापूर्वी चांगला खेळ केला आहे. या संघाने यंदा पहिल्या आठमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी नवोदितांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. संघात १७ ते २२ वयोगटांतील किमान अकरा खेळाडूंचा समावेश केला आहे.
दुधाळी येथे अमित पाटील, गौरव माने यांना आपले खेळाडू इतरत्र तालीम संघाकडून फुटबॉल खेळतात, त्यांच्याकरिता आपलाही संघ असावा म्हणून २००६च्या दरम्यान ‘साईनाथ स्पोर्टस् क्लब’ या फुटबॉल क्लबच्या नावाने ‘केएसए’कडे कनिष्ठ गटासाठी नोंदणी केली. २०११-१२ मध्ये ‘केएसए’च्या सर्व कनिष्ठ गटातील स्पर्धा जिंकत वरचे स्थान पटकावत हा संघ ‘ए’ डिव्हीजनमध्ये दाखल झाला.
या संघाने अल्पावधीतच ‘साईनाथ’नावाचा दबदबा निर्माण केला. यंदा या संघाने वेळेवर सराव आणि खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी विशेष व्यायाम सुरू केला आहे. ‘पहिल्या आठ’मध्ये येण्यासाठी खेळाडूंकडून संधीचे सोने करण्यासाठी कॉर्नर किक, फ्री कीक आणि शॉर्ट पासिंग यावर जादा भर दिला आहे. संघाचे बलस्थान अर्थात युवा खेळाडू आहेत. त्यांचा स्टॅमिना अनुभवींनाही मागे टाकत आहे.
संघातील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय शालेय व महाविद्यालयीन स्पर्धा गाजविल्या आहेत. त्यामुळे या खेळाडूंकडून स्थान तर अबाधित राखले जाणार आहे. याशिवाय भल्या-भल्या संघांना धूळ चारण्याचा मानसही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हा संघ जरी कागदावर सॉफ्ट वाटत असला तरी प्रत्यक्ष मैदानावरील कृतीवर भर देणारा आहे.
नवोदितांवरच आमची मदार
आमच्या संघात महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावर खेळलेले १७ ते २२ वयोगटांतील ताज्या दमाचे खेळाडू आहेत. त्यांच्या स्टॅमिन्याचा उपयोग योग्यरित्या करून संघाची बांधणी केली आहे. अचूक पास, शॉर्ट पासिंग आणि नियंत्रित खेळ या सर्व बाजूंवर संघातील प्रत्येक खेळाडूला लक्ष देण्यास भाग पाडले आहे. समोरच्या संघाची चाल काय आहे, हे जाणून निर्णय घेण्यासाठी शारीरिक श्रमाबरोबरच मानसिक तयारीही करून घेतली आहे. त्यामुळे समोर कितीही दिग्गज संघ असू दे, विजय मात्र आमच्याच संघाचा असणार आहे.
- संतोष पोवार, प्रशिक्षक, साईनाथ स्पोर्टस्
सर्वाधिक युवा
खेळाडूंचा भरणा
आमच्या संघात १७ ते २२ वयोगटांतील सर्वाधिक खेळाडू असणारा संघ म्हणून आमच्या संघाकडे पाहिले जाते. मात्र, आमच्या संघातील खेळाडूंच्या सरावातील सातत्यामुळे आम्ही यंदाच्या हंगामात पहिल्या आठमध्ये निश्चितच येऊ. त्यादृष्टीने सर्व अंगांनी आमच्या खेळाडूंची तयारी सुरू आहे. येणाऱ्या काळात आम्ही मैदानावर प्रत्यक्ष कृती करूनच दाखवू.
- गौरव माने, संघव्यवस्थापक,
साईनाथ स्पोर्टस्
स्टार खेळाडू
अभिजित चौगले, नीलेश साळोखे, मनोजसिंग अधिकारी (राष्ट्रीय खेळाडू), अश्विन टाक (सोलापूर), शिरीष पाटील (सोलापूर), समीर अष्टेकर, अशिष चव्हाण, रणवीर खालकर, वीरधवल जाधव, निखिल पोवार, ईशांत पोवार.
आमचे खेळाडू
एफसी पुणे संघाचा आघाडीचा खेळाडू निखिल कदम, डीएसके शिवाजीयन्सचा रोहन आडनाईक, अक्षय शिंदे हे ‘साईनाथ’चे एकेकाळी शिलेदार होते.
संघ उभारणीत यांचा
वाटा महत्त्वाचा
फिरोज इनामदार, गौरव माने, अमित पाटील, अर्जुन कदम, मनोज जाधव, धनंजय यादव, सूर्यदीप माने, युवराज कुरणे, सुनील पोवार, संजय गेंजगे, नीलेश साळोखे, रोहित साळोखे, अल्लाबक्ष इनामदार, सचिन जाधव, आदी.