संत बहिणाबाई या कोल्हापूरमध्येच घडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:29 AM2019-11-30T00:29:53+5:302019-11-30T00:30:27+5:30
कोल्हापूर : संत तुकाराम यांचे अभंग कोल्हापूरमध्ये त्या काळी बहिणाबार्इंच्या कानी आले नसते, तर पुढे त्यांच्याबाबतचा इतिहास होऊ शकला ...
कोल्हापूर : संत तुकाराम यांचे अभंग कोल्हापूरमध्ये त्या काळी बहिणाबार्इंच्या कानी आले नसते, तर पुढे त्यांच्याबाबतचा इतिहास होऊ शकला नसता. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या, हे लक्षात घ्यावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनातर्फे आयोजित ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ या द्विखंडात्मक ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, साहित्यिक प्रा. राजन गवस, गाथेचे ‘निरूपण’कार मारुती जाधव प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, बहिणाबाई यांच्या कुटुंबीयांनी काही कारणाने सिऊर (औरंगाबाद) येथील त्यांचे घर सोडले. फिरत-फिरत ते कोल्हापूरमध्ये आले. काही वर्षे ते येथे होते. त्यावेळी येथे साताऱ्याच्या जयरामस्वामी वडगावकर यांची कीर्तने सुरू होती. ते आपल्या कीर्तनांत तुकारामांचे अभंग सादर करीत. बहिणाबार्इंना जणू त्या अभंगांचे वेड लागले. त्यांनी तुकारामांना गुरू करायचे ठरविले. त्यांच्या दर्शनासाठी त्या देहूला पोहोचल्या. तेथे त्यांना तुकारामांचा गुरूपदेश, सहवास लाभला. त्यापुढे संत बहिणाबाई झाल्या. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या.
डॉ. शिंदे म्हणाले, संत तुकाराम यांनी जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची शिदोरी आपल्या अभंगांमधून खुली केली. हे ज्ञान माणसाचे जगणे सहजसोपे आणि नितांतसुंदर बनविणारे आहे.
मारुती जाधव म्हणाले, एखाद्या संताच्या अभंगांचा ग्रंथ प्रकाशित करणारे शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ही गाथा प्रकाशित करून विद्यापीठाने माझा व्यक्तिगत सन्मान तर वाढविलाच; पण वारकरी समाजासाठीही भरीव योगदान दिले आहे.
या कार्यक्रमात अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. मराठी अधिविभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
मराठी भाषेला
शब्दांची देणगी
संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला कितीतरी नवनवीन शब्दांची देणगी दिली. ही भाषा समृद्ध करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे अभंग आशयात्मकदृष्ट्या गहन आहेत. मारुती जाधव (तळाशीकर) गुरुजी यांनी आशयसूत्रे लक्षात घेऊन या अभंगांचे अत्यंत चिकित्सकपणे, सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरण केले. हे ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.