ज्योतिबा वसाहतच्या पूल दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:17+5:302021-09-15T04:29:17+5:30
धामोड : केळोशी खुर्दपैकी ज्योतिबा वसाहत (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला प्रकल्प व ज्योतिबा वसाहत दरम्यानच्या तुटलेल्या पूल व ...
धामोड : केळोशी खुर्दपैकी ज्योतिबा वसाहत (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला प्रकल्प व ज्योतिबा वसाहत दरम्यानच्या तुटलेल्या पूल व भराव्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व या तुटलेल्या पुलाच्या भरावयाची दुरुस्ती लवकरात लवकर करून लोकांची गैरसोय टाळावी, असे साकडे जिल्हाधिकाऱ्यांना घालण्यात आले. या वेळी लोकमतने या प्रश्नासंदर्भात आवाज उठवल्याबद्दल शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी लोकमतचे विशेष कौतुक केले.
लोंढा नाला प्रकल्पावरील हा पूल व त्याचा भरावा तुटल्याने गेल्या दीड महिन्यापासून ज्योतिबा वसाहत ग्रामस्थांचा धामोड बाजारपेठेशी संपर्क तुटलेला आहे. दळणवळणाची सुविधा बंद झाल्याने या ग्रामस्थांची मोठी ससेहोलपट झाली आहे. दळणकांडपासह दूध घालण्यासाठी सहा किलोमीटरची पायपीट करून केळोशी बुद्रुकपर्यंतचा पायी प्रवास सुरू आहे.
त्यानंतर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने याची दखल घेऊन काल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रशासनाच्या नाकर्तेपणावरती ताशेरे ओढण्यात आले असून गावकऱ्यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी लोकवर्गणीतून पैसे गोळा करणे हे लोकशाहीला घातक असल्याचे म्हटले आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा नियोजन समिती यांच्याकडून खास बाब म्हणून निधीची तरतूद करावी व पुलाच्या भरावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे.