मंत्री भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाची पोलिसात तक्रार

By उद्धव गोडसे | Published: November 20, 2023 04:13 PM2023-11-20T16:13:17+5:302023-11-20T16:14:40+5:30

४० दिवसात तिसरा तक्रार अर्ज, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sakal Maratha community in Kolhapur filed police complaint against minister Chhagan Bhujbal | मंत्री भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाची पोलिसात तक्रार

मंत्री भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाची पोलिसात तक्रार

कोल्हापूर : अंबड (जि. जालना) येथे शुक्रवारी (दि. १७) झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे-पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सकल मराठा समाज आक्रमक बनला आहे. राज्यात दंगल माजवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मंत्री भुजबळ यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने तक्रार अर्जाद्वारे सोमवारी (दि. २०) लक्ष्मीपुरी पोलिसांकडे केली. मंत्री भुजबळ यांच्या विरोधात गेल्या ४० दिवसातील हा तिसरा तक्रार अर्ज आहे.

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाने केलेल्या आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी नेते मराठा समाजाच्या मागणीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी अंबड येथे झालेल्या सभेत बोलताना सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीवर टीका केली. तसेच मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली, असा सकल मराठा समाजाचा आरोप आहे.

मंत्री भुजबळ यांच्या विघातक विधानांमुळे राज्यात जातीय दंगली भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. मंत्री पदावर असतानाही भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये घटनेची पायमल्ली करणारी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने तक्रार अर्जाद्वारे लक्ष्मीपुरी पोलिसांकडे केली. 

निवेदनावर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, रविकिरण इंगवले, सुभाष जाधव, राजू लिंग्रस, आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Sakal Maratha community in Kolhapur filed police complaint against minister Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.