कोतोली येथे लोकसहभातून साकारतंय तलाठी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:20+5:302020-12-16T04:38:20+5:30
करंजफेण : मनात जिद्द, अंगी झपाटून प्रामाणिकपणे काम करण्याची धडपड असेल तर अशक्य गोष्ट देखील साध्य करता येते. कोतोली ...
करंजफेण : मनात जिद्द, अंगी झपाटून प्रामाणिकपणे काम करण्याची धडपड असेल तर अशक्य गोष्ट देखील साध्य करता येते. कोतोली (ता. पन्हाळा) येथील मंडलाधिकारी सतीश ढेंगे यांच्या संकल्पनेतून कोतोली येथे लोकसहभातून सुसज्ज असे दुमजली तलाठी कार्यालय होत असून इमारतीचे काम पूर्णत्वास आले असल्याने जिल्ह्यात एक आदर्श निर्माण झाला आहे. कोतोली हे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असल्याने महसूल विभागाचे कामकाज येथून मोठ्या प्रमाणात चालते. येथील तलाठी कार्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आली होती. नवीन इमारतीची लोकांना नितांत गरज होती. ‘लोकमत’च्या बातमीमधून इमारतीची वेळोवेळी मागणी देखील केली होती, परंतु मागणी करून देखील शासनाने निधी देण्यास उदासीनता दाखविल्याने कित्येक वर्षे झाले ग्रामपंचायतीच्या खोलीमध्ये चावडीचे कामकाज सुरू होते. या मंडल विभागाला पाच सजा व सोळा गावे संलग्न असल्याने नागरिकांची व कर्मचाऱ्यांची जागेअभावी मोठी कुचंबणा होत होती. स्वमालकीच्या जागेतून लोकांची सेवा करता यावी व लोकांची गैरसोय दूर व्हावी हा ध्यास मनाशी ठेवून मंडलाधिकारी तसेच संबंधित तलाठी यांनी लोकसहभागातून इमारत बांधण्याचा चंग बांधला. त्यांना कोतोली तसेच परिसरातील लोकांनी देखील आपल्या परीने मदतीचे पाठबळ देऊन तब्बल पंधरा लाखांहून अधिक रकमेच्या इमारतीच्या बांधकामाला सहकार्य केल्याने सध्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रांतधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोकसहभातून उभारलेल्या तलाठी कार्यालयाचे काम पूर्णत्वास आले आहे.