कोल्हापुरात साकारतेय स्वयंचलित गुऱ्हाळ केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:01+5:302021-09-04T04:28:01+5:30
कोल्हापूर: देशातील एक नंबरचे स्वयंचलित गुऱ्हाळ केंद्र कोल्हापुरात प्रादेशिक गुळ संशोधन केंद्रात साकारत आहे. गुळ, काकवी, गुळ पावडर तयार ...
कोल्हापूर: देशातील एक नंबरचे स्वयंचलित गुऱ्हाळ केंद्र कोल्हापुरात प्रादेशिक गुळ संशोधन केंद्रात साकारत आहे. गुळ, काकवी, गुळ पावडर तयार करण्याचा हा पथदर्शी प्रकल्प आणखी वर्षभराने प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. शिवाजी विद्यापीठ, मुंबई आयआयटी व आयसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी अंतर्गत होत असलेल्या या एकछत्री प्रकल्पामुळे भविष्यात कोल्हापूरच्या गुळाचा व गुऱ्हाळ उद्योगाचा कायापालट होणार आहे.
जिल्ह्यात तीनशे कोटीवर उलाढाल असलेली सहाशेवर गुऱ्हाळघरे पारंपरिक पद्धतीने गुळाचे उत्पादन करताना दिसतात; पण अलीकडे आरोग्य जागृती वाढल्यामुळे गुळाचे आहारातील प्रमाणही वाढले आहे. निव्वळ गुळापेक्षाही त्याची पावडर आणि इतर उत्पादनांना बाजारात मागणी वाढल्याने पूर्णत: व्यावसायिक पद्धतीने गुळाचे उत्पादन करण्याची गरज वाढली होती. यात लागणारे भांडवल, मनुष्यबळ आणि लोकांची मानसिकता यामुळे हे एकट्याने करणे शक्य होत नाही. नेमकी ही गरज ओळखूनच प्रादेशिक गुळ संशोधन केंद्राने याकामी पुढाकार घेतला. मुंबईस्थित राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजीकडून संशोधन केंद्राला ६ कोटीचा एकछत्री प्रकल्प मंजूर झाला. त्यातील २ कोटी १६ लाखाच्या निधीतून सध्या काम सुरू झाले आहे. गुळ, काकवी आणि गुळ पावडर हे पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने तयार करण्यासाठीची यंत्रणा उभी केली जात आहे. यात पारंपरिक पद्धतीने चिपाडाबरोबरच बगॅस आणि तेल याचा इंधन म्हणून वापर केला जाणार आहे. ज्या कामाला २५ मजूर लागत होते, ते काम आता या नव्या यंत्रणेत १० मजुरांवर होणार आहे. गुळव्याऐवजी सेन्सरच्या आधारे गुळाची पक्वता निश्चित होणार आहे. गुळ उत्पादकांना हे तंत्र दिले जाणार असून, भविष्यात जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना चांगले दिवस येणार आहेत.
प्रतिक्रिया
या केंद्राचा उद्देश संशोधनाचा आहे. व्यावसायिक पद्धतीने उत्पादने घेतली जात नाहीत; पण हा एकछत्री स्वयंचलित प्रकल्प २०२२ मध्ये पुर्णत्वास गेल्यानंतर पदार्थ विक्रीच्या बाबतीतही निर्णय घेतला जाणार आहे.
प्रतिक्रिया
बी.जी.गायकवाड, वरिष्ठ संशोधक, प्रादेशिक गुळ संशोधन केंद्र
कर्मचारी भरती बंद असल्याने सध्या आहे त्या निम्म्या कर्मचाऱ्यांवर काम केले जात आहे. ५३ मंजूर पदापैकी २५ जण कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना अधिकाधिक मार्गदर्शन करण्यावर आमचा भर आहे.
विद्यासागर गेडाम, प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन अधिकारी.
चौकट
देशातील नंबर एकचे केंद्र
मार्केट यार्डसमोर असलेले हे गुळ संशोधन केंद्रातील देशातील तीन संशोधन केंद्रांपैकी एक आहे. आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश येथे अशा प्रकारचे केंद्र आहे. कोल्हापूर तर गुळाचे आगर. चव आणि रंगासाठी कोल्हापूरच्या गुळाची जगभर ओळख आहे. याच वैशिष्ट्याच्या जोरावर गुळ तयार करण्याच्या प्रक्रियेवर येथे सातत्याने वेगवेगळ्या पातळीवर संशोधन होते.
चौकट
आधुनिक गुऱ्हाळघर निर्मिती
पारंपरिक गुऱ्हाळघरांना फाटा देण्यासाठी म्हणून गुळ संशोधन केंद्राने आठ वर्षांपूर्वी आधुनिक पद्धतीचे गुऱ्हाळ केंद्र विकसित केले आहे. यात गुळव्याशिवाय गुळाची पक्वता ठरवण्याबरोबरच रस ओतण्यापासून ते रसाची काहील ओतण्यापर्यंत बऱ्यापैकी मानवरहित काम कसे होईल यासाठीचे यंत्र विकसित केले. आधुनिक पद्धतीच्या या गुऱ्हाळघरांचा वापर जिल्ह्यात अजून सुरू झाला नसला तरी मार्गदर्शन घेण्यासाठी गुऱ्हाळचालक येथे आवर्जून भेट देण्यासाठी येतात.
(फोटो स्वतंत्र फाईल देत आहे)