मराठीच्या भल्यासाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:48 PM2019-06-21T23:48:26+5:302019-06-21T23:48:31+5:30
उदय कुलकर्णी मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २० संस्था-संघटनांनी एकत्र येऊन ‘मराठीच्या भल्यासाठी’ नावाचं व्यासपीठ निर्माण ...
उदय कुलकर्णी
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २० संस्था-संघटनांनी एकत्र येऊन ‘मराठीच्या भल्यासाठी’ नावाचं व्यासपीठ निर्माण केलं. या व्यासपीठाच्यावतीने २४ जूनला मराठी भाषेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषा व प्राधिकरणाबाबत कायद्याला मंजुरी देण्याचा आग्रह धरणे आंदोलनाच्यावेळी धरला जाणार आहे. त्यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेटही घेणार आहे. याखेरीज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठी भाषेच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जाहीरनामा तयार करण्याचाही विचार आहे. ‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाकडून मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीसाठी रणशिंग फुंकले जात असतानाच इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि थोडेथोडके नव्हे, तर २ लाख ८७ हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याचं चित्र समोर आलं आणि मराठी भाषेची अवस्था किती गंभीर आहे याचा जणू दाखला मिळाला. खरं तर डॉ. नागनाथ कोतापल्ले व डॉ. शेषराव मोरे यांच्या समितीने पहिली ते बारावी मराठी भाषा सक्तीची करावी, अशी शिफारस केलेली आहे; पण याबाबत अंमलबजावणी झालेली नाही. उलट महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल अॅक्ट २०१२ (सुधारित कायदा २०१७) अंतर्गत राज्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सहजपणे परवानगी मिळत असल्यानं मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत. साहजिकच मराठी भाषा शालेय व उच्च माध्यमिक स्तरावर सक्तीची करणं, मराठी शाळांचं गुणवत्तेच्या संदर्भात सक्षमीकरण करणं आणि शालेय ग्रंथालय समृद्ध करून विद्यार्थ्यांनी वर्षभरात किमान १०-२० मराठी पुस्तकं वाचावीत असे उपक्रम राबविण्याबाबत अध्यादेश काढणं या ‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाच्या प्रारंभीच्या तीन प्रमुख मागण्या आहेत.
आपण मराठी बोलतो, पण भाषा बोलताना आणि वापरताना मराठी संस्कृती जपण्याचा आपल्याला विसर पडतो. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा बेंबीच्या देठापासून देणारी असंख्य माणसं एखाद्या स्रीला सोशल मीडियामधून ‘त्राहि भगवन्’ करून सोडताना अर्वाच्य भाषेत समस्त स्त्री जातीचा अवमान करणारी व विकृत मानसिकतेचं दर्शन घडविणारी मुक्ताफळं उधळत असतात. अभिनेत्री केतकी चितळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अशा प्रकाराच्या ताज्या बळी ठरल्या आहेत. केतकीनं तिच्याबाबतीत घडलेल्या ट्रोलिंंगला सडेतोड उत्तर देताना स्वत:ला मराठी भाषाभिमानी म्हणविणाºया माणसांना भाषेच्या शुद्धतेचे धडे दिले. तसेच मराठी माणसांची मानसिकता अशी असणार असेल, तर ती माणसं माझी असू शकत नाहीत अन् तो महाराष्ट्रही, असं सुनावलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेत असू तर शत्रूच्या स्रियांकडेही पाहण्याचा महाराजांचा दृष्टिकोन कसा होता, हे जाणून तोही अंगी बाणवायला नको का? आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना स्वीकारली असेल तर संसदेमध्ये श्रीरामाच्या नावानं घोषणा देऊ नयेत, अशी भूमिका घेतल्यानं नवनीत राणा अपशब्दांच्या धनी ठरल्या. मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचं अभिजातपण खरं कसं आहे हेदेखील आता मराठीच्या भल्यासाठी दाखवून देण्याची वेळ आली आहे!
शब्द आणि शब्दार्थ याबाबत आपण फारसे जागरूक नसतोच. मध्यंतरी एका महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचं काम सुरू होतं. अशा अंकाची जबाबदारी प्रामुख्यानं भाषा विषयाच्या प्राध्यापकाकडं असते. एका लेखात विद्यार्थ्यानं ‘खलबतं’ या शब्दाऐवजी ‘गलबतं’ असा शब्द वापरला होता. प्राध्यापकांनादेखील ‘खलबतं’ आणि ‘गलबतं’ या शब्दांच्या अर्थांमध्ये नेमका काय फरक आहे याची कल्पना नव्हती, हे पाहून माझ्यासारख्या माणसाला अस्वस्थ व्हायला झालं.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)