HSC Result 2022: साक्षीने वाजवली केएमटी कंडक्टर आईच्या 'स्वप्नांची बेल'; माय लेकींचा असाही योगायोग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:08 PM2022-06-09T15:08:33+5:302022-06-09T15:09:09+5:30
आई पहाटे ड्यूटीवर जायची, संध्याकाळी घरी यायची, पण, तोपर्यंत घरची कामे सांभाळून अभ्यास करायची.
नसिम सनदी
कोल्हापूर : कसबा बावड्यातील साक्षी कोळीने महावीर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून ६८ टक्के गुण मिळवत केएमटी कंडक्टर असलेल्या आईच्या स्वप्नांची बेल वाजवली. आईच्या २० वर्षाच्या कष्टाचे साक्षीने चीज तर केलेच, शिवाय आता पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढची वाटचाल सुरू होणार आहे. यानिमित्ताने लेकीच्या शिक्षणासाठी आईने केलेल्या कष्टाला फळ आले आहे.
कसबा बावड्यातील रेखा संदीप कोळी या केएमटीमध्ये कंत्राटी पद्धतीवर कंडक्टर म्हणून गेल्या पाच वर्षापासून काम करतात. रोजंदारीवर असल्याने ड्यूटी लागली तरच पगार मिळतो. पगार जरी १२ हजार असला तर हातात सात हजारच पडतात. एवढ्यात घरखर्च भागविणे कसरतीचेच. संसारात आर्थिक चणचणीमुळे कसरत करावी लागत असली तरी पोरांच्या शिक्षणाची मात्र त्यांनी आबाळ होऊ दिलेली नाही. मुलगा दहावीत तर मुलगी बारावीत. नोकरीच्या वेळा सांभाळून, प्रसंगी पोटाला चिमटा देऊन या आईने पोरांना शिक्षण दिले. चांगले शिक्षण मिळावे म्हणून फी भरून चांगल्या शाळेत प्रवेश मिळविले. कंडक्टर म्हणून नोकरी लागायच्या आधी धुणीभांडी व जेवणाची कामे करून मुलांना लहानाचे मोठे केले.
हे करताना स्वत:च्या स्वप्नांना मूठमाती दिली. पोलीस व्हायचे होते. पण, घरच्या विरोधामुळे होता आले नाही. आता साक्षीला पोलीस करण्यासाठी येथून पुढे संघर्ष असणार आहे. आईचा हा संघर्ष लहानपणापासून पाहिलेल्या साक्षीनेही महावीर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत मन लावून अभ्यास केला. आई पहाटे ड्यूटीवर जायची, संध्याकाळी घरी यायची, पण, तोपर्यंत घरची कामे सांभाळून अभ्यास करायची.
असाही योगायोग
दहावी झाल्यानंतर लग्न झाले, त्यानंतर १४ वर्षांनी रेखा कोळी यांनी बारावीची परीक्षा दिली. ६८ टक्के गुणांनी त्या उत्तीर्ण झाल्या. आता साक्षीलाही ६८ टक्केच गुण मिळाले आहे. माय लेकींचा असा गुणांचाही योगायोग जुळून आला.