SSC Result: वडिलांचे छत्र हरवलं, अनेक अडचणींचा सामना करत 'साक्षी'ने धवल यश मिळवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:46 PM2022-06-18T12:46:46+5:302022-06-18T12:47:11+5:30
साक्षीने वडिलांचे हरवलेले छत्र, दुर्गम आणि डोंगराळ भागात राहून देखील अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या ध्येयाला कर्तृत्वाची जोड देऊन दहावीच्या परीक्षेत ९६.४० % गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.
गारगोटी : कडगाव ता.भुदरगड येथील साक्षी महादेव कांबळे हिने वडिलांचे हरवलेले छत्र, दुर्गम आणि डोंगराळ भागात राहून देखील अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या ध्येयाला कर्तृत्वाची जोड देऊन दहावीच्या परीक्षेत ९६.४०% गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. कडगाव सारख्या दुर्गम भागात कोणत्याही सोयी सुविधा नसताना आणि घरी अठरा विश्व दारिद्य्र असतानादेखील तिने मिळवलेल्या विजयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
साक्षी कांबळे ही कडगाव येथील कुमार भवन या प्रशालेत शिक्षण घेत आहे. ती पाचवीत असताना वडील महादेव कांबळे यांचे निधन झाले. वडिलांच्या जाण्याने तिची आई निता कांबळे यांच्यावर आकाश कोसळले. तुटपुंजी जमीन, उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही पदरात दोन मुली! भविष्यात अंधार दिसू लागला. पण दीर आणि भाऊ पाठीशी ठाम उभे राहिले. दोन मुलींना आपले सर्वस्व मानले आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्या सज्ज झाल्या. त्यानंतर त्यांना आशा स्वयंसेविका म्हणून नोकरी मिळाली. या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी संसाराचा रथ ओढायला सुरुवात केली. मुलींनी देखील आपल्या परिस्थितीची कल्पना असल्याने जोमाने अभ्यास सुरू केला.
साक्षीने आईच्या कष्टाचे चीज करायचे ही जिद्द मनी बाळगून चांगला अभ्यास करुन दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. तिला इंजिनियरिंग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवायचा मानस आहे.