सीबीएसई बारावी परीक्षेत साकेत टोटला, शिवम पारेख ‘प्रथम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 06:02 PM2017-05-28T18:02:27+5:302017-05-28T18:02:27+5:30
कोल्हापूर पब्लिक स्कूलचा ९६ टक्के निकाल
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २८ : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (सीबीएसई) बारावी परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात कोल्हापूर पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६ टक्के लागला. या स्कूलमधील साकेत टोटलाने ८६ टक्क्यांसह विज्ञान शाखेत, तर शिवम पारेख याने ८८ टक्के गुण मिळवित वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकविला.
सीबीएसईतर्फे मार्च २०१७ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा गेल्या आठवड्यात जाहीर होणारा निकाल काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हा निकाल रविवारी दुपारी बारा वाजता सीबीएसईच्या संकेतस्थळावर आॅनलाईन जाहीर झाला. यात आर. एल. तावडे संचलित कोल्हापूर पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६ टक्के लागला.
यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के लागला असून या शाखेतील २३ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून ८ जणांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. यामध्ये साकेत टोटला (८६ टक्के) याने प्रथम, शुभम मोरे (८३ टक्के) याने द्वितीय, तर वैभव पाटीलने (७९ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेचा निकाल ९९ टक्के लागला. यात शिवम पारेखने (८८ टक्के) प्रथम, कल्याणी टोलीवाल (७६ टक्के) हिने द्वितीय आणि कृष्णा मालानी (६५ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका शुभांगी पवार, अंजली मेळवंकी, दिपक शेलार आदींचे मार्गदर्शन लाभले.