सुळेरान बंधाऱ्याजवळील साकवाचा भराव घुसला उसाच्या शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:10+5:302021-08-19T04:27:10+5:30
सदाशिव मोरे आजरा : अतिवृष्टीमुळे सुळेरान (ता. आजरा) येथील बंधाऱ्याजवळील साकवाचा भराव वाहून शेतात घुसल्याने अंदाजे पाच ते सहा ...
सदाशिव मोरे
आजरा : अतिवृष्टीमुळे सुळेरान (ता. आजरा) येथील बंधाऱ्याजवळील साकवाचा भराव वाहून शेतात घुसल्याने अंदाजे पाच ते सहा एकरांतील भात व ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. प्रमिला मधुकर नलवडे यांच्या मालकीचे हे शेत असून, अरुण सावंत ते खंडाने करीत आहेत. सध्या शेतात दगड-गोट्यांचा थर तयार झाला असून, अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. सुळेरान बंधाऱ्यातील पाण्याचा ओव्हरफ्लो सांडव्याच्या माध्यमातून काढला आहे; पण पावसाळ्यात पाणी जास्त असल्याने विसर्ग जास्त होतो. त्यामुळे धनगरमोळा ते अंबाडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी येणे व त्या भागातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यास अडचण होत असल्याने सुळेरान बंधाऱ्याच्या अलीकडे साकववजा मोरी बांधली आहे. चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या साकवाचा भराव थेट सावंत यांच्या शेतात घुसला आहे. त्यामुळे भात, ऊसपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
प्रतिवर्षी सुळेरान परिसरात तीन ते चार महिने अतिवृष्टीचा पाऊस होतो. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. चालू वर्षी दोन दिवस झालेल्या जुलै महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बांधलेल्या मोरीवजा साकवाचा भराव अतिवृष्टीने वाहून थेट शेतातच घुसला आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असतानाही ती बांधलेली नाही. त्यामुळे नदीचे पाणी थेट शेतात घुसते आहे. त्यामुळे साकवाशेजारी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.
फोटो ओळी : सुळेरान बंधाऱ्याजवळील साकवाचा भराव अतिवृष्टीने वाहून गेल्याने ऊस व भात पिकाचे असे नुकसान झाले आहे.
क्रमांक : १८०८२०२१-गड-०१