खुशखबर! गणेशोत्सवाच्या आधीच शिक्षकांचे वेतन जमा, मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश
By संताजी मिठारी | Published: August 31, 2022 02:22 PM2022-08-31T14:22:23+5:302022-08-31T14:28:52+5:30
नियमितपणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन जमा करण्यातील सातत्य शिक्षण विभाग आणि वेतन पथकाने ठेवावे
कोल्हापूर : यंदा गणेशोत्सवाच्या प्रारंभापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शिक्षकांच्याबँक खात्यावर ऑगस्ट महिन्याचे वेतन मंगळवारी जमा झाले. त्याची एकत्रित रक्कम ८५ कोटी रुपये इतकी आहे. राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपूर्वी जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने कार्यवाही केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशत: अनुदानित, डीएड कॉलेज, सैनिकी शाळांमधील ११ हजार शिक्षकांच्या बँक खात्यावर वेतन जमा करण्यात आले. शासनाने दिलेल्या मुदतीच्या दोन दिवस आधीच वेतन जमा करण्याची कार्यवाही पूर्ण केली असल्याची माहिती वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक रामदास म्हस्के यांनी दिली.
दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे वेतन जमा करण्याचा निर्णय चांगला आहे. नियमितपणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन जमा करण्यातील सातत्य शिक्षण विभाग आणि वेतन पथकाने ठेवावे, अशी मागणी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली.