वेतन, मानधन हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:35+5:302021-06-22T04:17:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आशांना १८ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये वेतन द्यावे यासह विविध मागण्यांकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आशांना १८ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये वेतन द्यावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी त्यांनी लढेंगे, जितेंगे, वेतन, मानधन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
आशांच्या शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना देण्यात आले. आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करीत असतानाही मानधनात वाढ मिळत नसल्याचे त्यांनी १५ जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तरीही सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनतर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत यादव म्हणाले, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चिकाटीने सुरू ठेवायचे आहे. सरकारने सकारात्मक मार्ग न काढल्यास तालुका पातळीवरही आंदोलन तीव्र करायचे आहे.
अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्ष सुवर्णा तळेकर म्हणाल्या, आशा, गटप्रवर्तकांचे आंदोलन मोडण्यासाठी सरकार अंगणवाडी सेविकांना कोरोनासंबंधीचे काम करण्यास सांगत आहे, पण अंगणवाडी सेविका ते काम करणार नाहीत. अंगणवाडी सेविकांचाही आशांच्या आंदोलनास पाठिंबा असेल.
राष्ट्रसेवा दलाचे बाबा नदाफ म्हणाले, आशा, गटप्रवर्तकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तरीही त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, हे गंभीर आहे.
अतुल दिघे म्हणाले, कोरोना काळ असल्याने दोन लाख रुपये पगार असणारेही आशा, गटप्रवर्तकांचे काम करणार नाहीत. यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आशा, गटप्रवर्तकांनी आंदोलन सुरूच ठेवावे. कामावरून कमी करण्याच्या सरकारच्या धमकीला भीक घालू नये. भरमा कांबळे यांचेही भाषण झाले. त्यानंतर दुपारी दोन वाजता निदर्शनाची सांगता झाली.
निदर्शनात युनियनच्या जिल्हा अध्यक्ष नेत्रदिपा पाटील, सचिव उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, प्रतिभा इंदूलकर, सुरेखा तिसंगीकर, सुप्रिया गुदले आदी आशा, गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.
चौकट
प्रमुख मागण्या अशा
गटप्रवर्तकांचे ११ महिन्यांचे करार पत्र बंद करून आशाप्रमाणे कायमचे नियुक्ती पत्र द्या.
गटप्रवर्तकांनाही अहवाल ठेवण्यासाठी तीन हजारांचा मोबदला मिळावा.
गटप्रवर्तकांच्या प्रतिदिन २५ रुपयांच्या भत्त्यात वाढ करा.
प्रसूती, वैद्यकीय रजा पगारी मिळाव्यात.
५०० रुपयांचा मोबाईल भत्ता मिळावा.
सन २०१९-२० मधील पूरस्थितीमधील सर्वेक्षणाचे मानधन मिळावे.
आशा, गटप्रवर्तकांचा देय प्रोत्साहनपर भत्ता मिळावा.
पती कोरोनाने मयत झालेल्या आशांना दहा लाख रुपये भरपाई मिळावी.
कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आशांना कोरोना संपेपर्यंत प्रतिदिन एक हजार रुपये द्यावेत.
चौकट
लक्षवेधी फलक अन दुर्गेचे रूप
निदर्शनातील अनेक आशा, गटप्रवर्तकांनी मागण्यासंदर्भात लक्षवेधी फलक हातात घेतले होते. योगिता पाटील यांनी दुर्गेचे रूप धारण करून मागण्यांवर प्रकाशझोत टाकला. राज्यकर्ते, अधिकारी मागण्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, कामाच्या तुलनेत मोबदला कमी मिळतो, हे सांगण्यासाठी राजश्री देसाई यांनी डोळ्यावर पट्टी बांधून हातात तराजू घेऊन सहभाग घेतला. लता सासने यांनी अनोख्या पद्धतीने मागण्यांचे फलक पाठीवर अडकून घेतले होते.
चौकट
गुन्हा दाखल करण्याच्या धमकीमुळे
रेल्वे स्टेशनपासून मोर्चा काढण्याचे नियोजन आशा, गटप्रवर्तकांनी केले होते. पण तेथून मोर्चा काढल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिसांनी दिल्यामुळे थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मोठ्या संख्येने दाखल होत त्यांनी निदर्शने केली.