केएमटीच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार

By Admin | Published: July 20, 2016 12:45 AM2016-07-20T00:45:08+5:302016-07-20T00:47:12+5:30

संप अखेर स्थगित : सहाव्या वेतन आयोगाबाबत एक महिन्याची मुदत, पाच तासांच्या चर्चेनंतर झाला निर्णय

Salary for KMT employees every month | केएमटीच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार

केएमटीच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार

googlenewsNext

कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत पगार देण्याचा तसेच सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देता येईल का, याचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी प्रशासनास एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी घेण्यात आला. सुमारे पाच तासांच्या चर्चेनंतर हा निर्णय झाला. त्यामुळे केएमटीच्या कर्मचाऱ्यांनी संप स्थगित केला.
आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, नाना जाधव, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, प्रवीण केसरकर, शेखर कुसाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, केएमटीचे संजय भोसले,
कर्मचारी प्रतिनिधी निशिकांत सरनाईक, राजेंद्र तिवले, प्रमोद पाटील, इर्शाद नाईकवडे, मनोज नार्वेकर, आदी उपस्थित होते. पाच तासांच्या चर्चेनंतर कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी प्रशासन, लोकप्रतिनिधींचा मान ठेवून तडजोड मान्य केली. आता पुढील बैठक
१९ आॅगस्टला होणार आहे.
तत्पूर्वी आयुक्त शिवशंकर यांनी सकाळी आयोजित केलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. बैठकीत प्रत्येक महिन्याचा पगार निश्चित केलेल्या तारखेला झाला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला पाहिजे, असा आग्रह कर्मचारी संघटनेने धरला. मात्र, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देणे शक्य नसल्याने तो विषय सोडून अन्य मागण्यांबाबत बोला, अशी ठाम भूमिका
आयुक्तांनी घेतली. साडेतीन तास चाललेल्या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे सायंकाळी बसून पुन्हा चर्चा करण्याचे ठरले. (प्रतिनिधी)


आयुक्तांची हतबलता : फंडाची रक्कम भरण्यास प्राधान्य
कर्मचाऱ्यांच्या थकीत भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्यास आम्हाला प्राधान्य द्यावे लागेल. चार कोटींपैकी एक कोटींची रक्कम या महिन्यातच भरावी लागणार आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी महासभेकडे निधी मागणीचा प्रस्ताव दिला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच केएमटीचे दैनंदिन उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने दररोज तीन लाख रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने आपण पगार केव्हा करायचे हे सांगू शकत नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले होते. जर सहावा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यायचे म्हटले तर बसगाड्या विकाव्या लागतील, अशी हतबलता आयुक्तांनी बोलून दाखविली. केएमटी आणि मनपा कर्मचाऱ्यांची तुलना करू नका, असेही त्यांनी बजावले.


नगरसेवक-कर्मचाऱ्यांत वादंग
नगरसेवक शेखर कुसाळे हे कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच बैठकीत बोलत होते; परंतु एक कर्मचारी प्रमोद पाटील याने गैरसमजुतीने कुसाळे यांना टोचून बोलल्याने त्या दोघांत मोठा वाद झाला. तू मला काही सांगू नकोस, अशा शब्दांत कुसाळे यांनी पाटील यास उतरून ठेवले. त्याचवेळी इर्शाद नाईकवडे यानेही या वादात तोंड घातल्याने चर्चेला वेगळेच वळण लागले. अखेर ताणतणावातच ही बैठक आयुक्तांनी संपविली.

Web Title: Salary for KMT employees every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.