महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाप्रमाणे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:45+5:302021-01-01T04:17:45+5:30

कोल्हापूर : महापूर आणि कोरोना महामारीसारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी चांगले काम करून आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुमारे ...

Salary to NMC employees as per 7th Commission | महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाप्रमाणे वेतन

महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाप्रमाणे वेतन

Next

कोल्हापूर : महापूर आणि कोरोना महामारीसारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी चांगले काम करून आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुमारे ४७०० कर्मचाऱ्यांना गुरुवारी नवीन वर्षाची भेट मिळाली. शुक्रवारपासून सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाणार असून फेब्रुवारीच्या पगारात नवीन पगारवाढ समाविष्ट केली जाणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीकरिता महानगरपालिका कर्मचारी संघाने गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी प्रशासन व कर्मचारी संघाचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. पालिका चौकात जमलेल्या कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात निर्णयाचे स्वागत केले.

चर्चेत प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, दिनकर आवळे, काका चरापले, विजय वणकुद्रे, अनिल साळोखे, अजित तिवले, सिकंदर सोनुले, अनिता रूईकर यांनी भाग घेतला.

वसुलीचे उद्दिष्ट स्वीकारले

घरफाळ्याच्या चालू मागणीच्या ९० टक्के तर मागील थकबाकीच्या ५० टक्के वसुली ३१ मार्चपूर्वी करावी, अशी अट राज्य सरकारने घातली होती. ती अट कर्मचारी संघाने मान्य करून वसुलीचे उद्दिष्ट आव्हान म्हणून स्वीकारले. त्यामुळेच पगारवाढीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. मिळकतींचे जीआयएस मॅपिंगचे उर्वरित काम मनपाचे कर्मचारी करणार आहेत. निर्णयानंतर तातडीने जादा ५० कर्मचारी घरफाळा विभागास देण्यात आले असून आपले दैनंदिन काम सांभाळून रोज सकाळी दोन तास हे कर्मचारी घरफाळा वसुलीचे काम करतील.

पगारवाढीचा करार होणार

गुरुवारच्या निर्णयानुसार महापालिका प्रशासन व कर्मचारी संघ यांच्यात १० जानेवारीपर्यंत पगारवाढीचा करार होणार आहे. कराराचा मसुदा कर्मचारी संघाने द्यायचा आहे. वेतन पडताळणी समिती स्थापन केली जाणार असून समितीने पंधरा दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार फिक्सेशन करायचे आहेत.

असा होईल लाभ -

- ४७०० कर्मचाऱ्यांना पगारवाढ.

- ३३०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार लाभ.

- पालिकेच्या तिजोरीवर पडणार महिन्याला २ कोटी २६ लाखांचा बोजा

- घरफाळा थकबाकी ३९ कोटी तर चालू मागणी ४१ कोटींची

- ८० टक्के मिळकतींचे जीआयएस मॅपिंग, उर्वरित काम ३१ जुलैपर्यंत करणार.

Web Title: Salary to NMC employees as per 7th Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.