विसर्जनाचे काम संपण्यापूर्वीच घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणार; मंजुलक्ष्मींचे आदेश
By भारत चव्हाण | Published: September 25, 2023 08:49 PM2023-09-25T20:49:06+5:302023-09-25T20:49:15+5:30
इराणी खण येथे रात्री नऊ वाजल्यानंतर गणेश विसर्जनाचा वेग कमी झाला, भाविकांची गर्दीही कमी व्हायला लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरगुती गौरी गणपती विसर्जनावेळी नेमलेल्या कर्मचाऱ्यांपैकी जे कर्मचारी अनुपस्थित होते त्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करुन त्यांची विभागीय चौकशी करण्याच्या सक्त सूचना महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी दिल्या.
प्रशासकांच्या या सुचनेमुळे घरगुती गौरी गणपती विसर्जनावेळी नियोजित ठिकाणी कामावरुन लवकर घरी जाणाऱ्या महापाालिकेच्या कर्मचाऱ्यांवर विघ्न आले आहे. प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी काम संपण्यापूर्वीच घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सोमवारी पालिकेतील बैठकीत दिल्या. त्यामुळे ही यादी तयार करण्याचे काम दुपारपासून सुरु झाले.
इराणी खण येथे रात्री नऊ वाजल्यानंतर गणेश विसर्जनाचा वेग कमी झाला, भाविकांची गर्दीही कमी व्हायला लागली. परंतू शहराच्या विविध भागातील दान करण्यात आलेल्या मूर्ती ट्रक, टेंपोतून इराणी खणीवर आणण्यात येत होत्या. मोठ्या संख्येने मूर्ती आल्यानंतर त्याचे विसर्जन करण्याकरिता कर्मचारी कमी दिसायला लागले. मग नेमलेले कर्मचारी कोठे गेले याची चौकशी करण्यात आली तेंव्हा अनेक जण न सांगताच घरी गेले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उपायुक्त, सहायक आयुक्त, अभियंते यासारख्या अधिकाऱ्यांना स्वत: गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता कन्वेअर बेल्टवर ठेवाव्या लागत होत्या. इराणी खणीवर नेमलेले कर्मचारी कामावर असते तर हे काम अधिक झटपट आणि लवकर संपले असते.
अधिकाऱ्यांना गणेशमूर्ती विसर्जन करावे लागत असल्याचे के. मंजुलक्ष्मी यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी कार्यालयात झालेल्या बैठकीतच जे जे कर्मचारी कामचुकारपणा करुन लवकर घरी गेले त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.