पगारी पुजारी कायदा मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार, राज्यमंत्री आदिती तटकरेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:18 PM2022-04-28T12:18:31+5:302022-04-28T12:19:00+5:30
कोरोनामुळे दोन वर्षे या कायद्याच्या अंमलबजावणीवर कोणतीही चर्चा झाली नाही. पण आता तटकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत बुधवारी याची प्राथमिक आढावा बैठक मंत्रालयात घेतली.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर अधिनियम २०१८ म्हणजे पगारी पुजारी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात यावा. त्यासाठी कार्यालयाला पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी, अशी सूचना पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी केली.
मंत्री तटकरे यांनी काही महिन्यांपूर्वी अंबाबाई मंदिराला भेट देऊन येथील विकासकामांची तसेच अंबाबाई मंदिर कायद्याची माहिती घेतली होती. कोरोनामुळे दोन वर्षे या कायद्याच्या अंमलबजावणीवर कोणतीही चर्चा झाली नाही. पण आता तटकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत बुधवारी याची प्राथमिक आढावा बैठक मंत्रालयात घेतली. या वेळी अव्वर सचिव आनंद होडावडेकर, कक्ष अधिकारी सुनीता साळुंखे, विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.
या वेळी राज्यमंत्री तटकरे यांना अंबाबाई मंदिर कायदा होण्यामागील पार्श्वभूमी तसेच कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यात आली. आजपर्यंत कायद्याची अंमलबजावणी का झाली नाही हेदेखील सांगण्यात आले. न्याय व विधी खाते थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्याने हा कायदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करणे गरजेचे आहे, त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली की कायद्याचे सादरीकरण केले जाईल.