Kolhapur: प्रवाशांच्या जिवाशी खेळ; हेडलाइट बंद तरीही रात्री धावली एसटी -video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 02:11 PM2024-06-06T14:11:53+5:302024-06-06T14:12:05+5:30
गगनबावडा : गगनबावडा-नृसिंहवाडी ही एसटी रात्री आठ वाजता साळवण ते गगनबावडा हेडलाइट नसतानाही धावली. यावेळी एकप्रकारे प्रवाशांच्या जिवाशी खेळ ...
गगनबावडा : गगनबावडा-नृसिंहवाडी ही एसटी रात्री आठ वाजता साळवण ते गगनबावडा हेडलाइट नसतानाही धावली. यावेळी एकप्रकारे प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळल्याचा प्रकार घडला.
गगनबावडा-नृसिंहवाडी या एसटी (एम.एच. ४० एन ९४४३) बसला साळवण येथे तांत्रिक बिघाड झाल्याने गाडीला लाइट नव्हती. त्यामुळे आगाराने याबाबत ताबडतोब दुसरी गाडी उपलब्ध करणे गरजेचे होते. परंतु, गाडी उपलब्ध नसल्याचे सांगून गाडीला उजेड नसतानाही गाडीमध्ये २०-२५ प्रवासी घेऊन ही एसटी गगनबावड्याकडे निघाली. साळवणमधून जवळपास २६ किमी अंतर रात्री ८ च्या सुमरास लाइट नसतानाही पार करणे म्हणजे प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये गगनबावडा आगाराचा गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे.
यावेळी काही वाहनधारकांच्या उजेडाचा आधार घेऊन ही एसटी धावत होती. पूर्ण अंधारातही बस वाट काढत होती. एकीकडे अपघातांची संख्या वाढत असताना इतक्या रात्री अंधारातून एसटी चालवून गगनबावडा आगाराने यातून काय सध्या केले, अघटित घडल्यास जबाबदार कोण, गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्यास वाहनचालकास संकटात का टाकायचे, यासह अनेक प्रश्न प्रवाशांसह नागरिकांना पडत आहेत.
खराब गाडी उद्या दुरुस्तीला टाकणार
याबाबत गगनबावडा आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता गगनबावडा-नृसिंहवाडी गाडी नादुरुस्त असल्याने एसटी उद्या दुरुस्तीला कोल्हापूरला पाठवणार आहे. त्यामधील काम ताबडतोब करणे शक्य नव्हते. गगनबावडा आगाराकडे गाड्या उपलब्ध नसल्याने असा प्रकार घडला असेल. - सुरेश शिंगाडे, व्यवस्थापक, गगनबावडा आगार