देवस्थानच्या २६८ एकर जमिनीची विक्री
By admin | Published: February 4, 2016 01:14 AM2016-02-04T01:14:04+5:302016-02-04T01:14:04+5:30
महसूल विभागाची पाहणी : स्थानिक यंत्रणा कमी दाखविल्याचा संशय, प्रत्यक्षात अधिक क्षेत्र
भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर
जिल्ह्यातील २६८ एकरांपेक्षा अधिक देवस्थानच्या जमिनींची बेकायदेशीर विक्री झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक जमिनींची विक्री झाल्याचा संशय आहे.
जिल्हा महसूल विभागाने केलेल्या पाहणीतून हे चित्र समोर आले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचे तब्बल पाच हजार ७७० फेरफार रद्द करून संबंधित जमिनीस मालक म्हणून देवस्थानचे नाव लावण्याची प्रक्रिया महसूल यंत्रणा करीत आहे. त्यासाठी संबंधित तालुका पातळीवरील प्रांताधिकाऱ्यांसमोर फेरफाराची सुनावणी सुरू आहे.
जिल्ह्यात देवस्थानची एकूण १८ हजार ९६१ हेक्टर जमीन आहे. या जमिनीचे मालक शासन म्हणजे
त्या-त्या गावातील देवस्थान आहे. जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून देवस्थानची पूजाअर्चा, देखभाल, दुरुस्ती करावी, असे अपेक्षित आहे. या जमिनी अनेक वर्षांपासून गावातील विशिष्ट कुटुंबांकडेच कसण्यासाठी आहेत. अनेक ठिकाणी देवस्थानच्या जमिनींवर कसणाऱ्यांची नावे वहिवाटदार म्हणून लागली आहेत; पण कायद्यानुसार ही जमीन विकता येत नाही. मालक म्हणून कसणाऱ्याचे नाव लावता येत नाही.
दरम्यान, दिवसेंदिवस जमिनीला सोन्याचा भाव येत आहे. त्यामुळे स्थानिक महसूल यंत्रणेला हाताशी धरून देवस्थान जमिनींची विक्री होत आहे.
चिरीमिरी घेऊन नोंदणी कार्यालयातील यंत्रणा कायद्यातील पळवाट शोधून खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महसूल विभागाने २०१० च्या शासन निर्णयानुसार देवस्थान जमिनीची छाननी करीत आहे. त्या छाननीत आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील पाच हजार ७७० फेरफार झालेल्यांची नोंदी मिळाल्या आहेत. कमीत कमी २० गुंठे जमिनींचे खरेदी-विक्री होत असत. त्यामुळे फेरफार झालेल्यांची संख्या अधिक २० गुंठ्यांचा नियम यांचा विचार केल्यास २६८ एकरांपेक्षा अधिक जमिनीची खरेदी-विक्री झाली आहे; पण जिल्हा महसूल प्रशासनास यापेक्षा अधिक जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे उलटतपासणीही केली जात आहे.
बेकायदेशीर फेरफार रद्द करून जमिनींना देवस्थानचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन जवळपास ४२ फेरफार रद्द करण्यात आले आहे.