औरवाडमध्ये बेकायदेशीर वाळूची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:09+5:302021-07-21T04:17:09+5:30
रमेश सुतार बुबनाळ : औरवाड (ता. शिरोळ) येथे बेकायदेशीर वाळूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नृसिंहवाडी-औरवाड पुलावरून ही ...
रमेश सुतार
बुबनाळ : औरवाड (ता. शिरोळ) येथे बेकायदेशीर वाळूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नृसिंहवाडी-औरवाड पुलावरून ही वाहतूक होत असते. याकडे महसूल प्रशासनासह पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलिसांचा औरवाड फाटा येथे बंदोबस्त असतो. मात्र, पोलीस तेथून गेल्यानंतर, इशाऱ्यावरून वाळूची वाहने वाळू विक्रीसाठी शिरोळ तालुक्यासह इचलकरंजी, हातकणंगले परिसरात सोडली जात आहेत.
या बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा औरवाड परिसरात धुमाकूळ माजला आहे. त्यामुळे यावर तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ कारवाई केव्हा करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना महामारीत अनेक व्यवसाय बंद होते. मात्र, औरवाड परिसरात वाळू विक्री जोमात सुरू आहे. महसूल कर्मचारी व पोलिसांच्या आशीर्वादाने दररोज शेकडो ट्रक वाळूची मध्यरात्री वाहतूक विक्रीसाठी होत असते. सोलापूर, मंगळवेढा, कर्नाटकातील काही परिसरात या ठिकाणाहून चोरीछुपे विना रॉयल्टी वाळू आणली जाते. या वाळूत औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या फौंड्री कारखान्यातील मिळणारी काळी राख, तसेच ओढ्यातील खराब वाळू मिक्स करून पाण्याने धुऊन विकली जात आहे. हा प्रकार सर्रास सर्वत्र सुरू आहे. ट्रकमधून तीन ते साडेतीन ब्रास वाळूची वाहतूक केली जात आहे. पर्यावरण विभागाने वाळू उपशास बंदी घातली असताना देखील औरवाडमधून एजंटाकडून वाळूची वाहतूक तालुक्यात सुरू आहे. दहाचाकी ट्रकमधून सात ते आठ ब्रास वाळूची विक्री केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडून मोठे नुकसान होत आहे. तरी याबाबत तलाठी, मंडल अधिकारी केव्हा कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
-----------------
चौकट -
एजंट मालामाल
बेकायदेशीर वाळू विक्रीतून एजंट मालामाल होत आहेत. एक ट्रक अडीच ब्रासचा २८ ते ३० हजार रुपयांनी विक्री केला जातो. यामागे एजंटाला दोन ते तीन हजार रुपये मिळतात. यामुळे कोरोनाच्या संकटातही वाळू एजंट मालामाल बनले आहेत.
चौकट -
कृष्णेचे पाणी वाढल्याने वाळूचोरी थांबली
औरवाड पाणवठ्यावर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोर कृष्णा नदीत रात्री-अपरात्री सुरू असणारी वाळूचोरी, सध्या नदीचे पाणी वाढल्याने थांबली आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वेेगाने वाढ झाली आहे. यामुळे तस्करांना वाळूचोरी करताना अडचणी येत आहेत.