वितरण केंद्रावरूनच दुधाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:33+5:302021-05-21T04:25:33+5:30
कोल्हापूर: वितरण केंद्रावरूनच दुधाची विक्री गुरुवारपासून पूर्ववत झाली. घरपोहोच नियम बदलल्यानंतर विक्रीमध्ये ३ हजार लीटरचीही वाढ झाल्याचे दिसले. दरम्यान, ...
कोल्हापूर: वितरण केंद्रावरूनच दुधाची विक्री गुरुवारपासून पूर्ववत झाली. घरपोहोच नियम बदलल्यानंतर विक्रीमध्ये ३ हजार लीटरचीही वाढ झाल्याचे दिसले. दरम्यान, मेडिकलमधून दूध विक्रीच्या पर्यायाला प्रतिसाद मिळाला नाही.
लॉकडाऊन कडक असतानाही दुधाच्या नावाखाली नागरिक बाहेर फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दुधाची विक्री घरपोहोच करण्याचे आदेश काढले होते; पण याला वितरकांकडून जोरदार विरोध झाला. दूध विक्रीच बंद ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने बुधवारी बैठक घेतली. यात विक्री केंद्रावरूनच दूध खरेदी करण्याची मुभा दिली. हे करताना सकाळी ६ ते १० ही वेळेत निश्चित करून दिली. हा तोडगा मान्य झाल्याने गुरुवारपासून होणारा बहिष्कार विक्रेत्यांनी मागे घेतल्याचे जाहीर केले.
गुरुवारी सकाळी पूर्वीप्रमाणे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत दूधाची विक्री झाली. जिल्ह्यातील ३५० अधिकृत विक्री केंद्रावरून १ लाख ३० हजार लीटरपर्यंतच्या दुधाची विक्री झाली. यात एकट्या गोकूळचा वाटा १ लाख ४ हजार इतका आहे. बुधवारी ही विक्री १ लाख १ हजार होती, त्यात गुरुवारी ३ हजारांनी भर पडली.
गोकूळची विक्री पूर्वपदावर
लॉकडाऊन कडक केला असला तरी दूध संकलन व विक्री मात्र सुरळीत सुरू आहे. गोकूळ दूध संघाचे रोजचे संकलन १३ लाख ३९ हजार लीटरचे आहे तर विक्री ११ लाख ३८ हजार लीटरची आहे. यातील ७ लाख २४ हजार लीटर एकट्या मुंबईकडे जात आहे. तेथील विक्री काही प्रमाणात घटली होती; पण ती आता पूर्ववत होत आहे.
गोवा, सिंधुदुर्गचा पुरवठा सुरळीत
गोवा व सिंधुदुर्गातही चक्रीवादळामुळे दूध पोहोचवण्यात अडचणी आल्या होत्या. त्या दूर करून गुरुवारी गोव्याला १,३९० लीटर तर सिंधुदुर्गला ५ हजार २५० लीटर पोहोच झाले.