कागल पालिकेकडून मैलायुक्त पाण्याचीही विक्री
By admin | Published: May 16, 2017 01:31 AM2017-05-16T01:31:58+5:302017-05-16T01:31:58+5:30
आदर्शवत कामगिरी : जिल्ह्यातील नागरिकांना मैला उपसा करून देण्याबरोबरच विल्हेवाटीचीही सुविधा
जहाँगीर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल :घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबवून राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कागल नगरपरिषदेने सर्वच घटकांनी दुर्लक्षित केलेल्या ‘मैला उपसा आणि विल्हेवाट’ यामध्येही आदर्शवत अशी कामगिरी बजावली आहे. शौचालयांचा मैला उपसा करून देण्याची जिल्हा व सीमाभागातही ‘सेवा’ पुरविण्याबरोबरच हे मैलायुक्त पाणीही रासायनिक प्रक्रियेसाठी कारखान्यांना विकण्याचा ‘उपयुक्त उद्योग’ नगरपालिकेने केला आहे.
साधारणत: आठ-दहा वर्षांचा कालखंड झाला की शौचालयाची शौचकुप्पी किंवा टाकी उपसा करावी लागते. काहीवेळा गळती दुरुस्तीसाठी तर नवीन बांधकामात शौचालय बदलताना हा मैला उपसा करावा लागतो. सध्या प्रत्येक घरात शौचालय आहेत. मात्र, त्या तुलनेत मैला उपसा करून देणारे घटक नाहीत. त्याचबरोबर केंद्र सरकारने मानवी हाताने मैला साफ करणे, त्याचे वहन करणे याला कायद्याने बंदी घातली आहे. सरकारी शौचालयांची साफसफाई सरकारी यंत्रणा करते पण वैयक्तिक मालकीच्या शौचालयांचा मैला उपसा कोणी करायचा? हा प्रश्न असतो. या अडचणीचा विचार करून कागल नगरपरिषदेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाने खासगी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरूआहे. त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे व्हॅक्युम प्रेशर मशीन्स खरेदी केली आहेत. ही मशीन एका ट्रॅक्टर टँकला जोडली आहेत. स्वच्छता विभागाकडील शैलेश म्हैतर, राहुल म्हेतर, आकाश कांबळे, रमेश कानडे, विकी कांबळे, युवराज सोनुले यांचे हे पथक यामध्ये प्रशिक्षित केले आहे. कोणतीही जाहिरात न करता कोल्हापूर जिल्ह्यातून तसेचसीमावर्ती भागातून मोठी मागणी आहे. आठवडाभर आधीच नोंदणी करावी लागते. शहरातील स्वच्छतेचे काम पाहात हे पथक नागरिकांना हा मैला उपसा करून देते.
गेली आठ-दहा वर्षे आम्ही स्वच्छता विभागातर्फे हा उपक्रम राबवित आहोत. कागल शहरात १४ ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. याची निगा राखत नागरिकांना खासगी सेवा दिली जाते. कारखान्यांना हे मैलायुक्त पाणी विक्री केल्यामुळे या पाण्याची विल्हेवाटेची? याची चिंता करावी लागत नाही.
- नितीन कांबळे,
स्वच्छता निरीक्षक,
कागल नगरपरिषद