बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांची राजरोस विक्री, कोल्हापुरात उघडकीस आला प्रकार
By उद्धव गोडसे | Published: March 9, 2023 06:31 PM2023-03-09T18:31:59+5:302023-03-09T19:32:21+5:30
गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेला रक्तस्रावाचा त्रास
कोल्हापूर : स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री बंद असली तरी, गोकुळ शिरगाव येथील एका मेडिकलमधून अशा गोळ्यांची विक्री झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर रक्तस्रावाचा त्रास होणारी महिला उपचारासाठी सीपीआरमध्ये आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारे रॅकेटही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे. दोन मुले असल्याने तिसरे मूल नको, असा विचार करीत त्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गोकुळ शिरगावमधील एका लॅबमध्ये सोनोग्राफी केली. त्यानंतर एका मेडिकलमधून त्यांनी गर्भपाताच्या पाच गोळ्या घेतल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेला रक्तस्रावाचा त्रास सुरू झाला. गेली दहा ते बारा दिवस रक्तस्रावाचा त्रास सुरू असल्याने ती गुरुवारी उपचारासाठी सीपीआरमध्ये आली.
डॉक्टरांनी केलेल्या चौकशीनंतर तिने गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सीपीआर पोलिस चौकीतील पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून याची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार गोकुळ शिरगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.