मुंबईतील विनाकागदपत्रांच्या चारचाकी वाहनांची कोल्हापूर जिल्ह्यात विक्री, वाहने चोरीची असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 02:05 PM2022-05-26T14:05:35+5:302022-05-26T14:06:09+5:30
वाहने खरेदी केलेल्यांनी कागदपत्रे मिळत नसल्याने पैशाची मागणी केली, पण त्यांना मंत्रालयात माझ्या ओळखी असल्याचा धाक दाखवला जात आहे.
तानाजी पोवार
कोल्हापूर : पन्नास हजारापासून १० लाख रुपयापर्यतची रक्कम घेऊन विनाकागदपत्रांच्या चारचाकी जुनी वाहने कोल्हापूर शहरासह करवीर, राधानगरी तालुक्यात अनेकांच्या माथी मारून एका वाहन एजंटाने अनेकांना लाखो रुपयाचा चुना लावला. वारंवार मागूनही वाहनांची कागदपत्रे मिळत नसल्याने सुमारे ५० हून अधिक खरेदीदार हवालदिल झाले आहेत. कागदपत्रे देण्यास एजंटाकडून टाळाटाळ होऊ लागल्याने ही वाहने चोरीची तर नसतील ना? अशी शंका प्रत्येकाच्या मनात येऊ लागली आहे. गुडाळ (ता. राधानगरी) येथील या वाहन एजंटाचा प्रताप आता चव्हाट्यावर आला आहे.
गुडाळ येथे सात-आठ वर्षे वाहन विक्री करणाऱ्या एजंटने आपले बस्तान बसवले आहे. गेल्या दोन वर्षात त्याने कोल्हापूर शहरात ०६, करवीर तालुक्यात ०७ तर राधानगरी तालुक्यात २६ वाहने आदी ठिकाणी मुंबई परिसरातून आणलेली चारचाकी वाहने पैसे घेऊन विक्री केली. कोल्हापुरातील जुन्या वाहन बाजारपेठेपेक्षा २५ हजार रुपये कमी दराने ही वाहने मिळत असल्याने अनेकांनी खरेदी केली. पण कागदपत्रे देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ होऊ लागल्याने खरेदीदार हवालदिल झाले. वाहने खरेदीदारांनी ५० हजार रुपयापासून १० लाख रुपयापर्यतच्या रकमा एजंटला दिल्या, पण त्याने दोन वर्षात कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याने वाहन खरेदीदार वैतागले.
जरा थांबा; फायनान्सची गाडीची कागदपत्रे उशिरा मिळतात
गाडी खरेदी करताना त्याची पूर्ण रक्कम एजंट घेतो, फायनान्सची गाडी असल्याने त्याची कागदपत्रे उशिरा मिळतात असे कारण सांगून त्याच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्याने अनेकांना कागदपत्रे देतो असे सांगून दोन वर्षे टोलवले आहे.
मंत्रालयातील ओळखीचा धाक
वाहने खरेदी केलेल्यांनी कागदपत्रे मिळत नसल्याने पैशाची मागणी केली, पण त्यांना मंत्रालयात माझ्या ओळखी असल्याचा धाक दाखवला जात आहे. ‘माझे कोणी वाकडे करू शकत नाही’ असेही पठाणी भाषेत बोलून तो खरेदीदारालाच दमदाटी करत असल्याचे चित्र आहे.
पोलीसही अनभिज्ञ
गेले दोन वर्षे हा विनाकागदपत्रांचा वाहन विक्रीचा व्यवहार होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. संबंधित वाहनांचे पासिंग हे वाशी, पनवेल या भागातील आहेत. बहुदा ही वाहने चोरीची असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे, पण त्याबाबत पोलीस अनभिज्ञ आहेत.