‘ब्याडगी’च्या नावाखाली ‘सिजन्टा’ची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:17 AM2018-04-30T00:17:42+5:302018-04-30T00:17:42+5:30
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ब्याडगी मिरचीच्या नावाखाली ‘सिजन्टा’ मिरचीची राजरोस विक्री सुरू आहे. ‘सिजन्टा’ दिसायला ‘ब्याडगी’सारखी असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असून, मिरची विक्रेत्यांकडून ब्याडगीच्या दरातच विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या आता लक्षात येणार नाही, पण पावसाळ्यात ‘सिजन्टा’ मिरचीची चटणी पिवळसर पडण्यास सुरुवात होईल आणि खरे रूप समोर येणार आहे.
पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून लाल मिरचीचा हंगाम जोरात सुरू आहे. कोल्हापुरात साधारणत: आंध्रप्रदेश व कर्नाटकातून मिरचीची आवक होते. यंदा मिरचीचे पीक कमी झाल्याने आवक मंदावली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून मिरची मागणीप्रमाणे येत नसल्याने दर थोडे चढेच राहिले आहेत. किलोमागे चाळीस ते पन्नास रुपयांनी दरात वाढ झाली आहे.
साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात लाल व तिखट चटणी खाण्याची सवय आहे. ही चटणी तिखट पण तेवढीच रूचकर लागत असल्याने ‘ब्याडगी’ अधिक लाल तिखट मिरची एकत्रित करून चटणी केली जाते. त्यामुळेच ‘ब्याडगी’ संकेश्वरी मिरचीला अधिक पसंती आहे; पण दोन वर्षांपासून मिरचीमध्ये भेसळ सुरू झाली आहे. गेल्यावर्षी आंध्रप्रदेशमधून ‘लाली’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. व्यापाऱ्यांनी त्याची विक्री ‘ब्याडगी’च्या दरानेच केली होती.
यंदा ‘लाली’ आणि ‘ब्याडगी’चे क्रॉस करून ‘सिजन्टा’ मिरची बाजारात आली आहे. ‘सिजन्टा’ दिसायला ‘ब्याडगी’सारखीच दिसते; पण या मिरचीचा खरा दर १२० रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहे. त्याची विक्री ‘ब्याडगी’च्या नावाखाली करून १८० ते २०० रुपये किलोने सुरू आहे. ‘ब्याडगी’ आणि ‘सिजन्टा’ या मिरचीतील फरक घाऊक व्यापाºयांनाच माहिती आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाºयांनाही चकवा बसला असून तेही याबाबत अनभिज्ञ आहेत. तेही ‘ब्याडगी’म्हणूनच ‘सिजन्टा’ची विक्री करत आहेत. चटणी केल्यानंतर त्याचा फरक दिसणार नाही, पावसाळ्यात ती पिवळी पडण्यास सुरुवात होणार आहे.
‘सिजन्टा’ कशी ओळखायची
ब्याडगी मिरचीचा शेंडा आपण खाल्ला तर तोंड भाजते; पण ‘सिजन्टा’ मिरचीचा शेंडा गोड लागतो आणि नंतर आंबट वाटतो. ग्राहकांनी चवीतून खरी ‘ब्याडगी’ ओळखली पाहिजे.