बाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:09 PM2020-02-19T14:09:30+5:302020-02-19T14:29:06+5:30

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने होत आहे. कोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलोने विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Sale of vegetables at market rates at soil level | बाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने

बाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने

googlenewsNext
ठळक मुद्देबाजार समितीत भाजीपाल्याची विक्री मातीमोल दरानेकोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलो : शेतकरी हवालदिल

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची विक्री मातीमोल दराने होत आहे. कोबी १, वांगी ५, टोमॅटो २ तर ढब्बू १० रुपये किलोने विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टी, महापुरात संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली; त्यातून सावरत पुन्हा लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेल असे अपेक्षित होते. साधारणत: आपल्याकडे आॅक्टोबरपासून स्थानिक भाजीपाला बाजारात येतो आणि दर उतरतात. मात्र, यंदा परतीच्या पावसाने भाजीपाला उशिरा आला.

डिसेंबर, जानेवारीपर्यंत भाजीपाल्याचे दर खाली येतात, मात्र फेबु्रवारीनंतर ते वाढू लागतात. उन्हाचा तडाका जसा वाढत जातो, तसे उत्पादन कमी मिळते. मागणी आणि पुरवठा यात तफावत राहते, परिणामी, दर वाढू लागतात मात्र, यंदा काहीशी परिस्थिती उलटी दिसते. फेबु्रवारी संपत आला तरी भाजीपाल्याच्या दरातील घसरण काही थांबत नाही.

मंगळवारी तर भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली. कोबीची २७८ पोत्यांची आवक झाली, यामध्ये किमान १ ते कमाल दर ५ रुपये किलो झाला. वांग्याच्या दरातही मोठी घसरण झाली असून, घाऊक बाजारात ५ पासून १५ रुपयांपर्यंत दर राहिला आहे.

शेतकऱ्यांना टोमॅटो बाजारापर्यंत आणायचा सोडाच, पण त्याच्या काढणीचे पैसेही अंगावर बसत आहेत. एरव्ही बारमाही तेजीत असणाऱ्या ढब्बूने शेतकऱ्यांना घाम फोडला असून, १० रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. तीच अवस्था गवारी, कारली, भेंडी, दोडक्याची आहे.

कोल्हापूर बाजार समितीमध्ये येणारा निम्मा माल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जातो. मात्र, आता निपाणीतील दहा-बारा शेतकरी एकत्रित येऊन थेट कोकणात माल पाठवत असल्याने येथील मालाला उठाव नाही, हेही दर घसरण्यामागे कारण सांगितले जाते. दरातील घसरण आणि कमिशनबाबत भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कर्नाटकातील आवकेचाही परिणाम

कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. विशेषत: घटप्रभा येथून जिल्ह्यातील मोठमोठ्या बाजारात भाजीपाला विक्रीसाठी येत असल्याने दरावर परिणाम होत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कोबीच्या गड्ड्यापेक्षा रोपाला दुप्पट दर

रोपवाटिकेतून कोबीचे रोप घेतले तर त्यासाठी दोन रुपये लागतात. त्याचा महिना-दीड महिना सांभाळ करून त्यापासून बनवलेला कोबीचा गड्डा मात्र एक रुपयाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कमिशन वसुलीतूनही लूट

कायद्याप्रमाणे खरेदीदारांकडून ६ टक्के प्रमाणे कमिशन घ्यायचे असते. मात्र, भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडूनच वसूल केले जातात. तक्रार येणार म्हणून त्याच्या पट्टीत न लावता, पैसे देताना तेवढे कमी करूनच दिले जाते, याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडत असून, नफा राहूदे खर्चच अंगावर येत आहे. त्यात ६ टक्केप्रमाणे कमिशन आमच्यातून घेऊन पिळवणूक सुरू आहे. याबाबत तक्रार करायची तर समिती पुरावे मागते.
-महादेव वाघमोडे,
शेतकरी, अंंबप


स्थानिक भाजीपाला आल्याने दरात घसरण झाली, ही वस्तुस्थिती आहे. कमिशनबाबत तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी समितीकडे यावे, संबंधित व्यापाºयांवर कारवाई केली जाईल.
-गजानन पाटील,
विभागप्रमुख, भाजीपाला
 

 

Web Title: Sale of vegetables at market rates at soil level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.