नामांकित कंपन्यांच्या लेबलवर बनावट टी-शर्टची विक्री
By admin | Published: March 4, 2015 11:36 PM2015-03-04T23:36:28+5:302015-03-04T23:45:54+5:30
कर्नाटकातील तिघांना अटक : ९ लाखांचे टी-शर्ट जप्त
कोल्हापूर : नामांकित कंपन्यांच्या लेबलवर बनावट टी-शर्टची विक्री करणाऱ्या कर्नाटकातील तिघाजणांना शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री कोल्हापुरात अटक केली. संशयित आरोपी महंमदमजीद महंमदबशीर अब्दुला (वय ३३, रा. हुशाहळी, पाद्रायनपुरा, बंगलोर), शिराज अब्दुल करीम (३७, रा. म्हैसूर), इम्रान जहिरुद्दीन सय्यद (२३, रा. बंगलोर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे बनावट टी-शर्ट पोलिसांनी हस्तगत केले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नरेंद्रसिंग सोबरनसिंग फौजदार (३८, रा. लाजपतनगर, नवी दिल्ली) हे दिल्लीतील नामांकित टी-शर्ट कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या दोन नामांकित कंपन्यांच्या टी-शर्टचे बनावट उत्पादन करून त्यांची विक्री कोल्हापुरात सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार कंपनीच्या अधिकारपत्रानुसार त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या मदतीने त्यांनी संशयित आरोपी राहत असलेल्या बागल चौकातील विश्रांकुर अपार्टमेंट या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील पी. एस. जाधव यांच्या फ्लॅटमध्ये छापा टाकला.
त्यामध्ये नामांकित कंपनीचे लेबल असलेल्या बनावट टी- शर्टचा साठा आढळून आला.
पोलिसांनी संशयित महंमदमजीद अब्दुल्ला, शिराज करीम, इम्रान सय्यद या तिघांना अटक केली. त्यांनी आतापर्यंत कोठे टी-शर्ट विक्री केली आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)