माजी आमदारांकडून मतांची विक्री
By admin | Published: January 4, 2016 12:07 AM2016-01-04T00:07:24+5:302016-01-04T00:30:56+5:30
हसन मुश्रीफ : विधान परिषद निवडणुकीतील ‘कागल’च्या राजकारणावर टीका
कागल : विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कागल-गडहिंग्लज मतदारसंघातील दोन राजकीय गटांनी आपल्या गटांचा जाहीर लिलाव करीत उमेदवारांकडून दलाली घेत मते विकली, अशी टीका दोन माजी आमदारांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. कागल तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ, भैया माने, शशिकांत खोत, कृष्णात पाटील, अंकुश पाटील, विकास पाटील, शिवानंद माळी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कागलचे सभापती श्रीकांत ऊर्फ पिंटू लोहार यांनी स्वाभिमानी भूमिका घेत सतेज पाटील यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.आमदार मुश्रीफ म्हणाले, आम्ही सुरुवातीलाच राष्ट्रीय कॉँग्रेस ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणू, असे जाहीर केले होते. आ. महाडिक वगळता सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांनी याबद्दल प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी मला फोनवर बोलावयास लावले. मी एकदा शब्द दिला की तो पाळतो. धनंजय महाडिक यांच्या खासदारकीसाठी मी मंत्रिपद पणाला लावून राजीनाम्याची घोषणा केली होती म्हणून लोकसभा, विधानसभा, गोकुळ, जिल्हा बॅँक, शेतकरी संघ, बाजार समिती आता विधान परिषदेत आमच्या धोरणांचा विजय झाला आहे. आमच्या मतदारसंघात मुरगूडकर पाटील गटाची अडचण मी समजू शकतो. मात्र, दोन गटांनी आपले गटच लिलावात काढले. यावेळी बोलताना भैया माने म्हणाले की, कागल पंचायत समितीचे सभापती पिंटू लोहार हे स्वाभिमानी योध्यासारखे राहिले. कारण त्यांनी महाडिक यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, महाडिक यांनी अमरीश घाटगेंना ‘गोकुळ’मधून उमेदवारी नाकारली. पण, सतेज पाटील यांनी घाटगेंना उमेदवारी देऊन निवडून आणले. सतेज पाटील यांच्या मदतीचे दातावरील किटाण निघाले नाही, तोपर्यंत त्यांना विसरायचे हे जमणार नाही. म्हणून त्यांचे जाहीर अभिनंदन करूया.
बिद्री साखर कारखाना पुन्हा ‘के.पीं.’कडेच राहील
केवळ संचालक मंडळाची मुदत संपली आहे म्हणून बिद्री साखर कारखान्यावर दुर्दैवाने प्रशासक आले आहे. दुसरे कोणतेही कारण नाही.
के. पी. पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे हा कारखाना चालविला आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. पोटच्या पुत्राप्रमाणे त्यांनी कारखान्यावर प्रेम केले आहे. म्हणून ‘बिद्री’त पुन्हा के.पी.च असतील यात शंकाच नाही, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.