तेलवाला बाबा सलमानचे कोल्हापुरातून पलायन, टक्कलग्रस्तांना औषधासाठी केली होती गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:44 IST2025-01-20T12:41:15+5:302025-01-20T12:44:07+5:30
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतली दखल

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : टक्कल पडलेल्या लोकांना केस येण्यासाठी औषध देणाऱ्याची चौकशी करण्यासाठी महावीर उद्यानात गेलेल्या महापालिकेच्या पथकाचा डोळा चुकवून सलमान ऊर्फ मोहम्मद सोहेलने पलायन केले. त्याच्या घरी पथकाने चौकशी केली; पण कोणतीही कागदपत्रे अथवा औषध मिळाले नाही. याप्रकरणी महापालिका त्याला नोटीस देणार आहे. दरम्यान, औषध नेण्यासाठी रविवारीही महावीर उद्यानात गर्दी होती.
‘लोकमत’ने रविवारच्या अंकात ‘लावा तेल, येतील केस ,’ असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्या सूचनेवरून आरोग्याधिकारी, पंचगंगा रुग्णालयाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, नागरी आराेग्य केंद्र क्रमांक १०चे वैद्यकीय अधिकारी, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल तसेच अन्न व औषध विभागाच्या निरीक्षकांनी सकाळी ११ वाजता येथे भेट दिली.
यावेळी टक्कल पडलेले १५० हून अधिक नागरिक सलमानकडून तेल लावून घेत होते. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने राजारामपुरीतील एका सलूनमध्ये पूर्वी काम केल्याचे सांगितले. पथकाने कागदपत्रांची मागणी केली असता त्याने ती घरी असल्याचे सांगितले. ते आणण्यासाठी पथकासोबत त्याच्या घरी निघाले असता त्याने गर्दीचा फायदा घेत जडीबुटी तेलासहित पळ काढला. त्यामुळे पथकाने त्याच्या न्यू पॅलेस रोडवरील घराला भेट दिली, तेव्हा तिथेही कुलूप आढळले.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतली दखल
‘लोकमत’च्या वृत्ताची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दखल घेतली असून, आरोग्य खात्याला चौकशीचे आदेश दिले. आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक, महापालिका तसेच अन्न आणि औषध निरीक्षकांनी कायदेशीर कारवाईसाठी पाऊल उचलले आहे.