साळवण पंचक्रोशीतील लोकमत वृत्तपत्र विक्रेता काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 06:35 PM2021-06-11T18:35:50+5:302021-06-11T18:36:53+5:30
Kolhapur Death news : गेली २०-२५ वर्ष प्रामाणिकपणे ऊन, पाऊस, थंडीमध्ये अविरतपणे रोज वृत्तपत्र विकत असताना किरवे गावापासून साळवणपर्यंत आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सर्वांच्या स्मरणात राहणारे मेहबूब बाळू झांजी (भैय्या) (वय ५२ वर्ष) यांच्या अकाली निधनानंतर एक कर्तृत्ववान, सहृदय व्यक्तिमत्व गमावलंय, अशी भावना पंचक्रोशीतुन व्यक्त होत आहे.
साळवण : गेली २०-२५ वर्ष प्रामाणिकपणे ऊन, पाऊस, थंडीमध्ये अविरतपणे रोज वृत्तपत्र विकत असताना किरवे गावापासून साळवणपर्यंत आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सर्वांच्या स्मरणात राहणारे लोकमत वृत्तपत्र विक्रेता मेहबूब बाळू झांजी (भैय्या) (वय ५२ वर्ष) यांच्या अकाली निधनानंतर एक कर्तृत्ववान, सहृदय व्यक्तिमत्व गमावलंय, अशी भावना पंचक्रोशीतुन व्यक्त होत आहे.
सकाळी सूर्योदयाबरोबर त्यांचा दिवस सुरु व्हायचा. सकाळी सहा वाजल्यापासून अकरा-साडे अकरापर्यंत किरव्यापासून साळवण पर्यंतच्या जवळपासच्या दहा-बारा गावात वाड्या वस्त्यांवर रोज वृत्तपत्र वाटणे हा नित्यनियम आणि यानंतर स्वतःचा व्यवसाय सांभाळणे हाही त्यांचा दिनक्रमच.
स्वतःच्या मृदू वाणीने आणि आपल्या गोड, प्रेमळ स्वभावाने सहवासातील व संबंधित सर्व लोकांच्या मनावर त्यांनी भुरळ पाडली होती. त्यामुळेच कि काय त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच सर्वाना नकळत भावना अनावर झाल्या. आपल्या हयातीत अनेकांना त्यांनी आपलसं करून टाकलं.
रमजान ईद असो वा बकरी ईद,आपल्या सहृदय स्वभावामुळे जोडलेल्या अनेकांना त्यांच्या घरातून शिरकुर्मा आठवणीने पोहोच व्हायचा. वृतपत्र विकत असताना किरवे गावापासून साळवणपर्यंत आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत जे त्यांनी आपले अतूट संबंध निर्माण केले, त्यामुळे ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर शोककळा कोसळली आहे.