Video: सॅल्यूट... १० महिन्यांच्या चिमुकल्यास सोडून 'आई' निघाली भारतमातेच्या रक्षणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:36 PM2023-03-16T13:36:15+5:302023-03-16T13:55:05+5:30
आपल्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून ही माता सीमारेषेवर निघाली आहे.
कोल्हापूर - देशसेवेच्या रक्षणासाठी घर, गाव, राज्य सोडून देशाच्या सीमारेषांवर जावं लागतं. त्यासाठी, खंबीर मन आणि तितकच धाडसही असावं लागतं. गावखेड्यातून, महाराष्ट्राच्या मातीतून हजारो मुलं भारत मातेच्या रक्षणासाठी तैनात आहेत. त्यात, कोल्हापूर आणि सातार जिल्ह्यातील युवकांची संख्या जास्त आहेत. अनेकदा ही मुलं जेव्हा घरी येतात किंवा घरातून ड्युटीसाठी निघतात, तेव्हाचे त्यांनी व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. मात्र, आता भारतमातेच्या संरक्षणासाठी निघालेल्या मायेचा व्हिडिओ पाहून तुमचे डोळे पाणावतील.
आपल्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून ही माता सीमारेषेवर निघाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगाव येथील वर्षाराणी पाटील या बीएसएफमध्ये दाखल होण्यासाठी निघालेल्या असताना त्यांचे कुटुंब त्यांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी, आपल्या लेकीला सोडण्यासाठी आलेल्या आई-वडिलांसह तिच्या पतीलाही अश्रू अनावर झाल्याचं व्हिडिओत दिसून येतंय. वर्षाराणी यांची पाठवणी करताना सर्वांना रडू कोसळलंय. सर्वांचं प्रेम पाहून वर्षाराणी यांनाही रडू आवरेना झाल्याचं दिसून येतय. मात्र, अंगात बीएसएफची वर्दी परिधान केलेली ही माता आपलं मन कठोर करुन सर्वांचाच निरोप घेते.
वर्षाराणी यांचे पती त्यांचे अश्रू पुसत त्यांना समजावून सांगताना दिसून येतात. तर त्यांच्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला आईपासून दूर करताना पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. माय-लेकराच्या ताटातुटीची होत असलेली ही घालमेल काळीज पिळवटून टाकणारी आहे, शिवाय या मातेच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट करायला लावणारीही आहे.