रामनवमीला जन्म झाल्याचे सांगून मुश्रीफ जनतेची फसवणूक करतायत, समरजित घाटगेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:55 PM2022-04-15T13:55:50+5:302022-04-15T13:56:33+5:30
मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये भव्य मोर्चा. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे.
कागल : गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहीरातीत प्रभु श्रीरामांचे नाव चुकीच्या पद्धतीने छापल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी यावरुन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. तर या निषेधार्थ मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये आज, शुक्रवारी भव्य मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे.
मंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन मोर्चाने आलेल्या समरजित घाटगे यांनी जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत पोलीस ठाण्यातुन जाणार नाही. अशी भुमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान मंत्री मुश्रीफ हे जन्म तारीख वेगळी असताना रामनवमीला जन्म झाल्याचे सांगुन जनतेची फसवणूक करीत आहेत असा गंभीर आरोप केला.
रामनवमीला मुश्रीफांचा जन्म झाल्याची माहिती खोटी आहे. मुश्रीफांनी जनतेला खोटी माहिती दिली. २४ मार्चला १९५४ ला रामनवमी नव्हती. खोटं बोलून ४० वर्षे जनतेची त्यांनी फसवणूक केली. मात्र, श्रीरामांची थट्टा बहुजन समाज खपवून घेणार नसल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला. यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, माजी महापौर सुनिल कदम हेही उपस्थित होते.
समरजित घाटगे यांचा मोर्चा निघण्याआधीच सकाळी मुश्रीफ यांनी या वादाबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी घाटगे याच्यावर घणाघाती टीका देखील केली.
समरजित घाटगेंचा स्टंट
माझ्या वाढदिवसाला कार्यकर्ते जाहीराती देतात. वाढदिवसाच्या दिवशी मी हजर नसतो. त्यामुळे समरजित घाटगे माझ्या विरोधात तक्रार दाखल करून फक्त स्टंट करीत आहेत. माझ्या वाढदिवसाला लोक दहा वीस पाने जाहीरात देतात या बद्दल यांच्या पोटात दुखत आहे. कागल ही राजर्षी शाहूची नगरी आहे. अशा जातीयवादी प्रवृत्तीला कागलची जनता योग्य जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती.
समरजित हे कुंडीत वाढलेले झाड
तर, कार्यकर्त्यानी संयम ठेवण्यास सांगत. त्यांना सामाजिक ऐक्य बिघडावयाचे आहे. आपण ते जपणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही केली होती.