राजे गटाला जागेसाठी समरजित घाटगे आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 12:40 PM2021-04-17T12:40:56+5:302021-04-17T12:43:32+5:30
Gokul Milk Election Kolhapur : गोकुळच्या राजकारणात आतापर्यंत स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना घेऊनच आपण पॅनलची बांधणी केली. गेली पंधरा वर्षे राजे गटाला संघात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आता आम्हाला न्याय देणार नसाल तर कार्यकर्ते माझेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासमोर स्पष्ट केले.
कोल्हापूर :गोकुळच्या राजकारणात आतापर्यंत स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना घेऊनच आपण पॅनलची बांधणी केली. गेली पंधरा वर्षे राजे गटाला संघात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आता आम्हाला न्याय देणार नसाल तर कार्यकर्ते माझेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासमोर स्पष्ट केले.
महाडिक यांनी शुक्रवारी सकाळी समरजित घाटगे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन सत्तारूढ आघाडीसोबत राहण्याची विनंती केली. यावर, आम्हाला सामान्य कार्यकर्त्याला गोकुळमध्ये संधी द्यायची असल्याने नवोदिता घाटगे यांनी अर्ज भरला नाही.
कोल्हापूर दक्षिण, कागल व एकूणच जिल्ह्यात राजे गटाला मानणारे शंभरहून अधिक ठराव आहेत. त्यामुळे गटाला एक जागा द्यावी. जर उमेदवारीचा विचार करणार नसाल तर कार्यकर्ते माझे ऐकतीलच असे सांगता येणार नसल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले. दिल्लीला गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्पर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. येत्या दोन दिवसांत सगळ्यांशी चर्चा करणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
राजे गटाला जागा मिळावी, यासाठी महादेवराव महाडिक यांना सांगितले. उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते माझे ऐकतील की नाही याबाबत शंका असल्याचे आपण महाडिक यांना सांगितले आहे.
- समरजित घाटगे (जिल्हाध्यक्ष, भाजप)