Kolhapur Politics: समरजित.. पुन्हा गाणार ‘भाजप’चे गीत; वरिष्ठ पातळीवरून हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:03 IST2025-02-07T12:02:13+5:302025-02-07T12:03:05+5:30
हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा

Kolhapur Politics: समरजित.. पुन्हा गाणार ‘भाजप’चे गीत; वरिष्ठ पातळीवरून हालचाली
कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार समरजित घाटगे हे पुन्हा स्वगृही दाखल होण्याची चर्चा भाजपमध्ये वेगाने सुरू आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाला असून, लवकरच प्रवेश होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडून घाटगे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभेला पराभव झाला होता. त्याआधी घाटगे केवळ भाजपमध्येच होते असे नव्हे, तर ते वर्षभरापूर्वीपर्यंत भाजपचे जिल्हाध्यक्षही होते. त्या काळात केंद्र आणि राज्य शासनातील अनेक मान्यवर मंत्र्यांनी घाटगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दिल्या होत्या. परंतु, दीड वर्षापूर्वी अजित पवार महायुतीमध्ये दाखल झाले. आमदारांना विधानसभेसाठी प्राधान्य देण्याचे ठरल्यानंतर मुश्रीफ हेच कागलचे उमेदवार असणार हे निश्चित होते. त्यामुळेच घाटगे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या प्रवेशाचा जंगी कार्यक्रमही कागलमध्ये पवार यांच्या उपस्थितीत झाला. पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी कागलमध्ये जाहीर सभा घेऊन मुश्रीफ यांना पाडा असे केलेले वक्तव्य राज्यभर गाजले. परंतु, तरीही मुश्रीफ विजयी झाले आणि घाटगे काय करणार अशी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, पंधरवड्यापूर्वी पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्यासमवेत दोन, तीन ठिकाणी समरजित कार्यक्रमात होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत अशी अटकळ बांधली जाऊ लागली. परंतु, गेल्या आठवड्याभरात समरजित यांच्या भाजप प्रवेशाचा विषय पुढे गेल्याचे सांगण्यात आले.
बाबांचा रूमाल
विधानसभा निवडणूक झाल्या झाल्या माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि प्रवेशाविषयी चर्चा केली. संजयबाबा यांची भाजप प्रवेशाची खेळी म्हणजे समरजित यांच्याआधी रूमाल टाकण्याचा प्रकार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. परंतु, वेळ पडल्यास दोन्ही घाटगेंचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो असे सांगण्यात येते. समरजित यांचे भाजपचे दरवाजे बंद करण्यासाठीच संजयबाबा यांचा भाजपप्रवेश अगोदर व्हावा अशा हालचाली कागलातूनच सुरू होत्या.
सहकार समूहाला प्राधान्य
समरजित हे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांची शिक्षण संस्था, बँक आहे. या पार्श्वभूमीवर हा संस्था समूह सांभाळताना केंद्र आणि राज्यातील सरकारविरोधी भूमिका घेणे फारसे हिताचे नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे ते पुन्हा भाजपचे गीत गातील असे सांगण्यात येते.