समरजित-संजय मंडलिक यांची ‘गट्टी’
By admin | Published: October 30, 2016 01:10 AM2016-10-30T01:10:20+5:302016-10-30T01:11:35+5:30
कागल-मुरगूडच्या युतीवर शिक्कामोर्तब : ‘राष्ट्रवादी’बरोबरच्या बोलणीने उडवला गोंधळ
कोल्हापूर : कागल तालुक्यातील कागल व मुरगूड नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपचे नेते व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे व शिवसेनेचे संपर्कनेते व सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांच्यातील युतीवर शनिवारी सायंकाळी येथे शिक्कामोर्तब झाले. शनिवारी दुपारनंतर अचानक मंडलिक व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या युतीची जोरदार हवा झाल्यामुळे राजकीय गोंधळ उडाला. तालुक्याचे राजकारण कोणत्या थराला जाणार याचीच चुणूक त्यातून दिसून आली.
येथील नागाळा पार्कातील ‘विठ्ठल कृपा’ या शाहू कारखान्याच्या कार्यालयात समरजित घाटगे, प्रवीणसिंहराजे घाटगे, संजय मंडलिक, बाबासाहेब हिंदुराव पाटील, भूषण पाटील व अतुल जोशी यांच्यामध्ये बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाली. त्यामध्ये दोन्ही नगरपालिकांतील जागावाटप व नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांबाबतचे धोरण निश्चित झाले. पक्षीय विचार केला असता ही युती भाजप-शिवसेनेचीही आहे; परंतु हे दोन्ही पक्ष राज्यस्तरावर एकत्र येण्यापूर्वीच या दोन नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. कागल तालुक्याची जडणघडण ज्यांनी केली, त्यांचे वारसदार पुन्हा एकत्र येत आहेत, अशी त्यामागील भावना होती. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या दोन्ही नगरपालिकांतील युतीबाबत भाजपच्या वतीने समरजित यांना सर्वाधिकार दिले होते. युती निश्चित मानली जात असतानाच दुपारी अचानक संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांची भेट घेतल्याने वादळ उठले. मुश्रीफ व मंडलिक यांची युती नक्की झाल्याची जोरदार चर्चा त्यामुळे सुरू झाली; परंतु ती अल्पकाळाचीच ठरली.
फॉर्म्युल्याबद्दल उत्सुकता
कागलचा नगराध्यक्ष हा समरजित घाटगे गटाचा, तर मुरगूडचा मंडलिक गटाचा असेल. कागलला मंडलिक गटास, तर मुरगूडला घाटगे गटास उपनगराध्यक्षपद दिले जाईल. कागलला वीसपैकी व मुरगूडला १७ पैकी कोण किती जागा लढविणार व त्यातील संजय घाटगे यांना किती देणार, हे मात्र समजू शकले नाही.
कागल-मुरगूड नगरपालिकेतील शिवसेनेचे नेते संजय मंडलिक यांच्यासोबतची युती निश्चित झाली. कुणी किती जागा लढवायच्या यासंदर्भातील माहिती आम्ही आज, रविवारी सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर करु. - समरजित घाटगे, भाजप नेते
कागल-मुरगूडमध्ये आमची समरजित घाटगे यांच्याशीच युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी युती झालेली नाही. काही कार्यकर्त्यांनी युतीबाबत प्राथमिक चर्चा केली असली तरी ती शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.
- संजय मंडलिक, शिवसेना नेते
बाबगोंड पाटील फोन उचलत नाहीत तेव्हा...!
विठ्ठल कृपा येथे बैठक सुरु असतानाच बाबगोंड पाटील व चंद्रकांत गवळी यांनी राष्ट्रवादीसमवेतच्या युतीच्या पत्रावर सह्या केल्याची माहिती बैठकीत आली. त्यामुळे अतुल जोशी यांनी तातडीने त्या दोघांशी संपर्क साधला; परंतु ते मोबाईल घेत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी मंडलिक कारखान्याचे दोन कर्मचारी पाठविण्यात आले व त्यांना दोघांनाही बाबगोंड पाटील यांच्याच घरी थांबावे, असे बजावण्यात आले. तशी यंत्रणा कामाला लावूनच मंडलिक कागलला रवाना झाले.
संभ्रम वाढविण्यासाठीच...
समरजित घाटगे व मंडलिक यांच्यातील युतीवर रात्री साडेसात वाजता शिक्कामोर्तब झाल्यावरही मुश्रीफ यांच्याकडून रात्री नऊ वाजता कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात युती झाल्याचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादीला १५ जागा व शिवसेनेला ५ तर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असेल असा फॉर्म्युला ठरला असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीकडून भय्या माने, नविद मुश्रीफ, प्रकाश गाडेकर, अशोक जकाते, तर मंडलिक गटाकडून कारखान्याचे संचालक बाबगोंड पाटील, चंद्रकांत गवळी यांच्या सह्या आहेत. गंमत म्हणजे युती झाल्यावर रात्री मंडलिक व समरजित यांनी कागलमध्ये बाबगोंड पाटील यांच्याच घरी भेट देऊन चर्चा केली.