समरजितसिंह यांनी दाखविले राजकीय कसब
By admin | Published: November 10, 2015 11:13 PM2015-11-10T23:13:39+5:302015-11-11T00:03:39+5:30
शाहू कृषी संघ : जुन्या, नव्यांचा मेळ घातल्याने निवडणूक बिनविरोध
जहाँगीर शेख -कागल --येथील शाहू समूहातील १५ कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या श्री छ. शाहू कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १५ जागांसाठी बरोबर १५ अर्ज दाखल होत ही निवडणूक बिनविरोध झाली. या संघाचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनांनंतर शाहू समूहातील ही पहिलीच निवडणूक असल्याने विक्रमसिंहराजेंच्या प्रती श्रद्धा आणि विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रती असणारी सहानुभूती या निमित्ताने सभासदांनी दाखवून दिली. असे असले तरी समरजितसिंह घाटगेंनी जुन्या-नव्या संचालक मंडळांची रचना करीत आपल्यातील राजकीय कसबची झलकही दाखवून दिली आहे.
या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते. कारण विक्रमसिंह राजेंच्या निधनामुळे या शाहू समूहात आजही त्यांची पोकळी जाणवत आहे, तर राजे गट वगळता संजय घाटगे गटाला मानणारे सभासद तसेच मुश्रीफ गटाचे काही समर्थक सभासद या संघात आहेत, पण लोकभावनेप्रमाणेच आमदार हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनी या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामध्ये सदैव बंडखोरीच्या पवित्र्यात असणारे काही स्वयंभू नेते होते. यामुळे समरजितसिंह घाटगेंना पॅनेल रचना करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले. त्यांनी भविष्यातील या कृषी संघाची व्याप्ती आणि व्यवसाय तसेच संघटन याचा मेळ घालत पॅनेलची रचना केली. पाच संचालकांना थांबविले. त्यामध्ये ज्येष्ठ संचालक धोंडिराम मगदूम यांची तब्येत ठीक नसते. विजयसिंह घोरपडे यांच्या जागी प्रशांत घोरपडे (खडकेवाडा) यांना संधी दिली. युवराज पसारे (कागल) यांना दूध संघावर संधी दिल्याने त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याऐवजी करनूरच्या विमल चौगुलेंना संधी देत करनूर गावाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिले, तर सुनील मगदूम (सिद्धनेर्ली), उत्तम पाटील (बाचणी) ही तरुण बिग्रेड निवडून पुढील इरादेही स्पष्ट केले. नानासाहेब घाटगे, अरुण शिंत्रे, रंजना सातवेकर यांना संधी देत भागनिहाय प्रतिनिधित्व जपले. पंकज वीरकुमार पाटील यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी कायम ठेवली. एकूणच समरजितसिंह घाटगे यांनी कृषी उद्योग संघाचा आणि राजकीय संघाचाही विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजेंची शिस्त कायम....
विक्रमसिंहराजे गटात कोणतीही निवडणूक लढविताना गटाची परवानगी घेतल्याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल केले जात नाहीत. या निवडणुकीतही इच्छुकांनी आपले अर्ज समरजितसिंह घाटगे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी सांगितलेल्या १५ जणांनीच निवडणुकीचे अर्ज भरले. संघाची एक पंचवार्षिक २००५ची निवडणूक वगळता सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.