समर्थ रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा ही तर भाकडकथा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:05 PM2024-11-09T12:05:43+5:302024-11-09T12:06:28+5:30
देशाच्या गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणे चुकीचे
कोल्हापूर : समर्थ रामदास महाराजांनी तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला सांगणे आणि त्यातून स्वराज्य स्थापना होणे ही एक भाकडकथा आहे. या भाकडकथेच्या आधारावर देशाच्या गृहमंत्र्यांनी बोलणे आणि दिशाभूल करणे हे चुकीचे आहे, अशी टीका इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.
समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असे विधान गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील प्रचारसभेत केले. शाह यांच्या या विधानाला सावंत यांनी आक्षेप घेतला.
सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, त्यांचे पिताजी शहाजी महाराज यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराज यांनी १६४२ पासूनच स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. १६४२ ते १६७२ या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदास महाराजांचे नाव कुठल्याही अस्सल कागदपत्रांमध्ये नोंदविलेले नाही. त्यामुळे हे चुकीचे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केले आहे.
सावंत म्हणाले, खरेतर भाजप आणि त्यांच्या परिवारातील मंडळींनी आखलेली ही एक व्यूहरचना आहे. कारण राज्यपाल असताना भगतसिंह कोश्यारी यांनी अगर रामदास न होता.. तो शिवाजी को कोण पूछता.. अशी सुद्धा मुक्ताफळे उधळली होती. एवढेच नव्हे, तर गोविंदगिरी महाराजांनी ही शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख वारंवार केला होता.
समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत : संभाजीराजे
समर्थ रामदास महत्त्वाचे आहेत. त्यांचे ते महत्त्व त्याठिकाणी. त्याला आम्ही आव्हान देत नाही. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. शिवाजी महाराजांच्या एकमेव गुरू म्हणजे राष्ट्रमाता जिजामाताच आहेत, अशी स्पष्ट भूमिका स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतली आहे.