समता संघर्ष समितीची निदर्शने
By admin | Published: June 21, 2016 01:02 AM2016-06-21T01:02:36+5:302016-06-21T01:15:23+5:30
इचलकरंजी प्रांतांकडे मागणी : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खुनाचा तपास गतीने करावा
इचलकरंजी : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व डॉ. एम. एस. कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास अधिक गतीने होऊन दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन येथील समता संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले.
निवेदनात, दाभोलकर यांच्या खुनाचा ३४ महिने, पानसरे यांच्या खुनाला १६ महिने, तर कलबुर्गी यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ कालावधी लोटला असूनही खुनाचा तपास पूर्ण होऊ शकला नाही. याबाबत महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. पानसरे यांच्या खुनासंदर्भात सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटक झाली. मात्र, तपास पुढे मंदावल्याचे दिसते. तर आता दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी साधक वीरेंद्र तावडे याला अटक केली आहे. तसेच सनातनचे दोन साधक सहभागी असल्याचे सीबीआयचे मत आहे. एवढे होऊनही सनातनचे प्रवक्ते व वकील दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे सनातन संस्थेच्या सर्व कार्यालयांवर छापे टाकून तेथे काय चालते, याचा तपास करावा. फरार झालेल्या साधकांना शोधून काढून त्यांची छायाचित्रे सर्व पोलिस ठाण्यांमध्ये लावावीत, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य सुनील स्वामी, शारदा चव्हाण, विनायक चव्हाण, माधव कुलकर्णी, बजरंग लोणारी, दत्ता माने, प्रसाद कुलकर्णी, साहेबलाल मुल्ला, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)