संभाजी ब्रिगेड लोकप्रतिनिधींना जाब विचारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:06+5:302021-06-27T04:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीती असताना सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा खेळ सुरू केला आहे. सगळ्यांनाच आरक्षण द्यायचे आहे मग आडवले कोणी? मूक आंदोलनासह सर्वच आंदोलने झाली, आता थेट लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे. मात्र राज्यात सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारने आपआपली वोटबँक टिकवण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण दिले. ‘एसईबीसी’चे आरक्षण टिकणार नाही, अगोदरच आम्ही सांगितले होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी गेली तीस वर्षे मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड संघर्ष करत आहे.
परंतु आघाडी व युती सरकारांनी समाजाची फसवणूक केली आहे. बहुजन समाजाचा घटक असलेल्या मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले. ओबीसीकरण झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण अशक्य असून त्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी विधीमंडळात एकमताने निर्णय घेतला पाहिजे, असे आखरे यांनी सांगितले. डॉ. प्रदीप तुपेरे, अण्णासाहेब सावंत, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
संघर्ष तेवत ठेवून राजकीय पोळी भाजली
ओबीसी व मराठा समाजात गेली अनेक वर्षे आरक्षणावरून संघर्ष तेवत ठेवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला.
संभाजीराजेंची भूमिका योग्यच
खासदार संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या पातळीवर त्यांनी केलेल्या मागण्या बाजूला ठेवून आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे आल्याचे आखरे यांनी सांगितले.