‘कैलासगड’ राखण्यात संभाजी जाधव यशस्वी
By admin | Published: November 3, 2015 12:19 AM2015-11-03T00:19:50+5:302015-11-03T00:23:55+5:30
वैयक्तिक गाठीभेटी ठरल्या महत्त्वाच्या : दहा वर्षांत केलेल्या कामांची शिदोरीच आली उपयोगी--कैलासगड स्वारी
कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळाच्या परिसरात विखुरलेल्या या प्रभागात तसा तालमीचा प्रभाव मोठा आहे. मात्र, तालमीचेच कार्यकर्ते एकमेकांविरोधात ठाकल्यामुळे सर्वसामान्यांसमोर मतदान कुणाला करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मुलगा अभिषेक यांच्यासाठी सेनेची उमेदवारी खेचून आणली होती. तरीही विद्यमान नगरसेवक व भाजप उमेदवार संभाजी जाधव यांनी एकाच वेळी माजी नगरसेवक संभाजी देवणे, अभिषेक देवणे यांच्याबरोबर लढत देत विजयावर शिक्कामोर्तब केले. जाधव यांनी अभिषेक देवणे यांचा ७२६ मतांनी पराभव करीत तिसऱ्यांदा महापालिका सभागृहात जाण्याचा मान मिळविला.
या प्रभागात माजी नगरसेवक संभाजी देवणे यांनी पत्नी विद्यमान नगरसेविका शारदा यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. त्यांचा या प्रभागात गेल्या १५ वर्षांहून अधिक काळचा संबंध आहे. त्यांनी या कार्याच्या शिदोरीवरच निवडणुकीत उभे राहण्याची संधी घेतली; तर अभिषेक देवणे यांनी, वडील विजय देवणे यांचा या परिसरात असणारा दांडगा संपर्क आहे. त्याचा लाभ आपल्याला होईल आणि त्यातून आपण निवडून येऊ, असा कयास बांधला होता. मात्र, संभाजी जाधव यांनी ‘एकला चलो रे’ करीत स्वत: एकटे मतदारांना भेटून ‘मला मतदान करा’ असे सांगत मतदान अक्षरश: खेचून आणले. येथे पाटाकडील तालीम मंडळाचा दबदबा मोठा आहे. निवडणुकीत जरी ही मंडळी एकमेकांविरोधात ठाकली तर तालमीच्या प्रश्नी खांद्याला खांदा लावून पुन्हा एकत्रित येणार, अशी स्थिती निवडणुकीनंतरही आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी देवणे हे पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहतील असे वाटत होते. मात्र, अनपेक्षितपणे अभिषेक यांनी मुसंडी मारत पहिल्याच निवडणुकीत १३९२ इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. संभाजी जाधव यांनी केवळ ‘मी यापूर्वी केलेले काम पाहा आणि मला मतदान करा,’ असे म्हणत दोन हजार मतांचा टप्पा ओलांडला व ‘कैलासगडची स्वारी’ आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. या प्रभागात काँग्रेसच्या सुरेश साबळे यांना केवळ ३१ मते मिळाली; तर अपक्ष प्रदीप मराठे यांनी २०८ इतकी मते मिळविली. राजेंद्र ढेरे यांना केवळ २५ आणि हकीम सरदार यांना १६ मते मिळाली. २७ जणांनी ‘नोटा’चा वापर केला.