संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी मदत करणार आहात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 08:15 PM2021-06-11T20:15:37+5:302021-06-11T20:20:38+5:30
chandrakant patil Maratha Reservation Bjp Kolhapur : मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे खासदार संभाजीराजे यांना विचारला.
कोल्हापूर : मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे खासदार संभाजीराजे यांना विचारला.
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून महापालिका, भाजप, ताराराणी आघाडीच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी पहिल्यांदाच संभाजीराजे यांना अशी थेटपणे विचारणा केली आहे.
आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत जो आंदोलन करेल त्यांच्यासोबत आम्ही राहू. यासाठी संभाजीराजे यांचे नेतृत्व पुढे आले आहे; परंतु संभाजीराजेंनी हे लक्षात घ्यावे, की आंदोलनातील चालढकल कशासाठी चालली आहे. हे कळण्याइतकी मराठी जनता सुज्ञ आहे. नवीन नेतृत्व उभे राहील की नाही, हे माहिती नाही. मात्र, यातून मराठा समाजाचे नुकसान होईल. समाज निराश होईल.
संभाजीराजे यांना आंदोलनाची आठवण करून देताना आमदार पाटील म्हणाले, ह्यतुम्ही कोल्हापुरातून १६ जूनला मोर्चा काढणार होता. आता म्हणे ते नाही. आता आमदार, खासदारांना याबाबत जाब विचारणार. मग तुम्ही म्हणताय की, मूक आंदोलन करणार, मग म्हणताय, पुणे मुंबई लाँग मार्च काढणार. तुम्ही नेमकं काय करणार आहात, त्यातून काय साध्य होणार आहे, हे एकदा समाजापुढं मांडलं पाहिजे.