मोदींनी ४० वेळा भेट दिल्याचे संभाजीराजे सांगत नाहीत : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:20 PM2021-05-27T18:20:40+5:302021-05-27T18:23:11+5:30
Bjp chandrakant patil Kolahpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी संभाजीराजेंविषयी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कशी सकारात्मक भूमिका घेतली हे स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, संभाजीराजे यांना खासदार केल्यानंतर अमित शहा यांनी मला त्यांना घेवून चार्टर्ड फ्लाइटने राष्ट्रीय अधिवेशनासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वजण उठून त्यांचे अभिनंदन करू या असे आवाहन शहा यांनी केले. तेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते, मंत्र्यांनी उठून संभाजीराजे यांचे अभिनंदन केले. हा त्यांचा मोठा सन्मानच केला गेला. हे मात्र संभाजीराजे सांगत नाहीत.
कोरोनाची स्थिती असल्याने आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संभाजीराजे ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी यांची भेट मागत आहेत, हा विषय राज्याच्या अखत्यारीतील असल्यामुळे कदाचित ही भेट होत नसावी. मात्र या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीवाले याच मुद्द्यावरून संभाजीराजेंना प्रोत्साहीत करत असावेत.
त्यांच्याविरोधात एकही शब्द बोलणार नाही
मोठे शाहू महाराज, संभाजीराजे किंवा मालोजीराजे समोर आल्यानंतर आमच्या देहबोलीतून आम्ही त्यांच्याविषयीचा आदर व्यक्तच करत असतो. मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांनी काही भूमिका घेतली तरी ते शाहू महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांच्याविरोधात मी एकही शब्द बोलणार नाही, असेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.