संभाजीराजे नाशिक लोकसभेच्या रिंगणात शक्य, स्वराज्य पक्षाची संघटनात्मक बांधणी
By विश्वास पाटील | Published: February 14, 2023 01:28 PM2023-02-14T13:28:59+5:302023-02-14T13:29:35+5:30
महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिल्यास तगडे आव्हान
विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे हे नाशिक लोकसभा मतदार संघातून येणारी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांनी बांधणी सुरू केली आहे. त्यांनी ११ फेब्रुवारीला वाढदिवस यावर्षी नाशिकलाच साजरा केला आहे. आगामी २०२४ ला स्वराज्य पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आपली ताकद दाखवेल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
नाशिकला मागच्या दोन निवडणुकीत शिवसेनेकडून हेमंत गोडसे लोकसभेवर निवडून गेले आहेत. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यांच्याशीही संभाजीराजे यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यांची सध्याची राजकीय लाइन भाजपशी मिळती जुळती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना अजूनही भाजपचा पडद्याआडचा हात सोडायचा नाही, असे दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांना मोठे बळ आहे. सध्याच्या घडामोडीही त्यांच्या सूचनेनुसारच सुरू असल्याचे सांगण्यात येते. स्वराज्य पक्षाच्या गावोगावी शाखा स्थापन करण्याचा त्यांचा धडाका लावला असून, दोनशेहून अधिक शाखा सुरू झाल्या आहेत.
महाविकास आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहे. मागील दोन निवडणुकीत छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव झाला आहे. या जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा पारंपरिक मतदार आहे. आता प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेसोबत आहेत. त्यांच्या ‘वंचित’च्या उमेदवारास गेल्या निवडणुकीत तिथे एक लाखावर मते मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिल्यास तगडे आव्हान उभे राहू शकते.
तसे पाहता कोल्हापुरातही संभाजीराजे यांना चांगली स्पेस आहे. कोल्हापूरच्या जनतेचे छत्रपती घराण्याशी भावनिक नाते आहे. त्यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा, मराठा समाजासाठी झगडणारा नेता येथेही हवा निर्माण करू शकतो. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडे निवडणुका एक वर्षावर आल्या असतानाही ताकदीचा उमेदवार नाही. त्यांनी यापूर्वी २००९ला पहिल्याच लढतीत मोठे आव्हान निर्माण केले.
लोकसभेच्या २०१९चा निकाल
हेमंत गोडसे (शिवसेना) - ५, ६३,५९९
समीर भुजबळ (राष्ट्रवादी) - २,७१,३९५
माणिकराव कोकाटे (अपक्ष) - १,३४,५२७
पवन पवार (वंचित आघाडी) - १,०९,९८१.
दृष्टिक्षेपात निकाल
२००४-२००९ : राष्ट्रवादी काँग्रेस
२०१४-२०१९ : शिवसेना